जेजुरी : भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा ताफा पोलिसांनी अडवण्यात आला आहे. त्यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत याचा निषेध केला. आज अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) यांची जयंती आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि सदाभाऊ खोत चोंडीला जात होते. तेव्हा त्यांना तिथे जाण्यापासून रोखण्यात आलं. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. एकच छंद गोपीचंदच्या घोषणेने परिसर दुमदुमला. पडळकर आणि खोत यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) जोरदार टीका केली. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
अहिल्याबाई होळकर यांची जयंती आहे. “काहीही झालं तरी मी चौंडीला जाणार आणि अहिल्याबाईंना अभिवादन करणारच”, असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय. “चौंडीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय . त्यांना परवानगी दिली जाते मग आम्हाला अभिवादन करण्यापासून रोखण्याचं कारण काय? हो कुणल्या संविधानात बसतं”, असा सवाल पडळकरांनी विचारलाय.
“एवढ्या वर्षानंतर पवारांना कधी चौडींची आठवण आली नाही.आताच त्यांना का इकडे यावं वाटतंय. याचं उत्तर आधी पवारांनी द्यावं. रोहित आणि शरद पवार या आजोबा आणि नातवाने प्रशासनवर दबाव आणलाय. त्यामुळे आम्हाला अडवण्यात आलं. पण काहीही झालं तरी आम्ही चौंडीला जाणारच, आमच्यावर कारवाई झाली तरी आम्ही मागे हटणार नाही, असंही पडळकर म्हणालेत.
पडळकरांसोबत सदाभाऊ खोत देखील उपस्थित आहेत. त्यांनीही पवारांवर टीका केलीये. “चौंडीचा सातबारा पवारांच्या नावावर नाही. ती पवारांची जहागिरी नाही, त्यामुळे आम्हाला अडवण्याचा त्यांना अधिकार नाही”, असं सदाभाऊ खोत म्हणालेत.
पोलिसांनी अडवल्यांनंतर पडळकरांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली. ‘एकच छंद गोपीचंद’, अश्या घोषणा देण्यात आल्या. तसंच शरद पवारांचा निषेधही करण्यात आला.