रायगड : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी ओबीसी आरक्षणाच्या (OBC reservation) इम्पेरिकल डाटावरुन राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “हे भुजबळ एकदा जेलमधून आल्यानंतर संपल्यात जमा आहे. ते परत डोकं वर काढत आहेत”, असा बोचरा वार नारायण राणे यांनी केला. ओबीसींच्या इम्पेरिकल डेटा केंद्राने पुरवावा यासाठी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यासाठी छगन भुजबळ आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यावरुन नारायण राणे यांनी हल्लाबोल केला.
नारायण राणेंची जन आशिर्वाद यात्रा आज कोकणात आहे. या यात्रेला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला.
आरक्षणचा मुद्दा क्लियर झालेला आहे. मराठा आणि ओबीसीचा मुद्दा क्लियर केले आहे. छगन भुजबळ एकदा जेलमधून आल्यानंतर संपल्यात जमा आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांना दिल्लीत पाठवू नये. तुम्ही सत्तेत होता 15 वर्ष काय केले? आता आम्ही काही तरी करत आहोत. आता राज्यात विरोधी पक्षात बसा, आता बस झालं तुमचं, असं नारायण राणे म्हणाले.
नारायण राणे म्हणाले, “महापुरानंतर केंद्रीय कृषीमंत्र्यांनी महाराष्ट्राला 700 कोटी रुपये पाठवले, आता राज्य सरकारने ते पैसे तातडीने वाटावे, अन्यथा मी परत पंतप्रधानांना सांगेन की आपली मदत वाटली गेली नाही, लोकांना मदत मिळत नाही”.
आता तुम्ही मातोश्रीला घरी बसलेले आहेत, कायम घरीच बसा, असा हल्लाबोल राणेंनी उद्धव ठाकरेंवर केला.
हे सरकार आहे तरी कुठे, जनतेने या राज्यात भाजपचं सरकार यावं, मुंबई महापालिका आम्ही जिंकावी, मुंबई जगातील सुंदर, पर्यटन, आरोग्यदायी शहर बनवण्याची क्षमता फक्त भाजपमध्ये आहे, अशी जनतेची भावना आहे. शिवसेनेचा आशिर्वाद आम्हाला नको, महागात पडेल, त्यांचा रोखीचा आशिर्वाद असतो, अशी खिल्ली नारायण राणे यांनी उडवली.
कोकण माझं घर आहे घरी आल्यावर आनंद होतोच. आज कोकणात येताना प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील हेदेखील सोबत आहेत. मी पाहिला दौरा कोकणचा केला. या दौऱ्याचा अहवाल घेऊन मी दिल्लीत गेलो. तिकडून मदत मागितली, केंद्राने 700 कोटी रुपये पाठवले. मी परत पंतप्रधानांना सांगेन की तुम्ही दिलेली मदत अजून लोकांना मिळालेली नाही, असं नारायण राणे म्हणाले.
संबंधित बातम्या
OBC Reservation : छगन भुजबळ दिल्ली दौऱ्यावर, देशातील बड्या वकिलाला भेटणार!
गुळाच्या ढेपेला मुंगळे चिटकलेत, देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर हल्ला