नाशिक : विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या मुलीला पाडणं ही भाजपाची चाणक्यनीती, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली. नाशिकमध्ये भुजबळांनी (Chhagan Bhujbal) पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निकाल आणि आगामी वाटचालीबाबतची माहिती दिली.
रोहिणी खडसे यांचा जळगावातील मुक्ताईनगर मतदारसंघात पराभव झाला. शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा पराभव केला. याबाबत छगन भुजबळ यांनी ही भाजपची चाणक्यनीती होती असं नमूद केलं.
शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी फॉर्म्युल्यावर
राजकारणात कधी काय होईल ते सांगता येत नाही. राजकारणात कधी काहीही होऊ शकते. शिवसेनेकडून आम्हाला प्रस्ताव आलेला नाही, त्याबाबत काँग्रेस राष्ट्रवादी विचार करेल. आदित्य ठाकरे जर मुख्यमंत्री झाले किंवा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर शुभेच्छा, असं छगन भुजबळ यांनी नमूद केलं.
स्वबळावर सत्तेत येणार हा भाजपचा दावा खोटा ठरला. शिवसेनेलाही फटका बसलाय. विरोधी पक्ष म्हणून सरकारवर अंकुश ठेवणार. वाट्टेल ते करू ही सरकारची मानसिकता चालू देणार नाही, असं भुजबळांनी ठणकावलं.
कार्यकर्त्यांना सल्ला
गेले काही दिवस मला सरकारी पाहुणचार घ्यावा लागला, त्यामुळे नाशिकपासून काही काळ दूर राहव लागलं. आपल्याला काँग्रेस राष्ट्रवादीचा गड कायम राखायचा आहे. जे झालं गेलं ते विसरून जायचं, असा सल्ला छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना दिला.
मधली अडीच वर्ष आम्हाला सरकारी पाहुणचार घ्यावा लागला , म्हणून मी नाशिकपासून दूर होतो. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीची पकड निसटली होती. विपरीत परिस्थितीमध्ये झुंज देण्याचा आदर्श पवारसाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रा समोर ठेवला. अनेक ठिकाणी उमेदवार देखील नव्हते. पवार साहेबांचा आदर पाहून जनतेने त्यांना साथ दिली. सेना भाजपविरोधात जे कोणी लढू शकत नाही त्यांना कार्यकर्त्यांनी आणि जनतेने साथ दिली, असं भुजबळ म्हणाले.
पवारांनी प्रेरणा दिली
पवार साहेबांची भर पावसातील सभा बघून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. जनतेने देखील ठरवलं की पवारांना साथ द्यायला पाहिजे . पराभूत उमेदवारांनी खचून जायचं कारण नाही. खचून जाऊ नका, पक्षाच्या कामाला लागा, पक्ष तुमच्या कामाची नोंद निश्चित घेईल, असा विश्वास भुजबळांनी उमेदवारांना दिला.
जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद 1 नंबरला आली आहे. आम्ही सर्वपक्षीय आमदार एकसंध होऊन विधानसभेत जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवू, असं भुजबळ म्हणाले.
काँग्रेस-राष्ट्रवादीला वंचितचा फटका बसला. अनेक ठिकाणी त्यांच्या मतांच्या विभाजनामुळे फटका बसला. बाळासाहेब थोरात यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. वंचितच्या अटी अशा होत्या की त्यांनी आघाडीत यायचं नाही हे दिसत होतं. जर एकत्र असतो तर भाजप सत्तेपासून दूर राहिली असती, असा दावा छगन भुजबळ यांनी केला.
दिवाळीनंतर जोमानं कामाला लागणार. पराभूत झालेल्या उमेदवारांवर नवी जबाबदारी देणार, असं भुजबळ म्हणाले.