येवला : माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे (NCP) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपण येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक (Assembly Election) लढणार असल्याचे जाहीर केलं आहे. मात्र, कोणत्या पक्षातून निवडणूक लढणार यावर बोलण्यास त्यांनी टाळले. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या त्यांच्या शिवसेना (Shivsena) प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.
छगन भुजबळ गणपती उत्सवानिमित्त अनेक गणेश मंडळांना भेटी दिल्या. येवला येथील शिवसेनेच्या महाराष्ट्र मित्र मंडळ गणपती मंडळालाही त्यांनी भेट दिली. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी घोषणा देत भुजबळांचे स्वागत केले. भुजबळांनी लवकर सेनेत प्रवेश करावा, अशी मागणीही शिवसैनिकांनी केली.
गेल्या अनेक दिवसांपासून छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा वारंवार होत आहे. भुजबळ मंगळवारी (3 सप्टेंबर) येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील विंचूर येथे विविध विकास कामांचे लोकार्पण सोहळ्यानिमित्त आले होते. त्यावेळी या कार्यक्रमाला शिवसैनिकांची मोठी उपस्थिती दिसत होती. यावेळी संबंधित शिवसैनिकांनी भुजबळ यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश करण्याचा आग्रह धरला.
भुजबळांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांच्या घोषणा
येवला येथे मुक्कामी असलेल्या छगन भुजबळांनी आज (4 सप्टेंबर) दुसऱ्या दिवशी संध्याकाळी येवला येथील गणेश मंडळांना भेट दिली. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या महाराष्ट्र मित्र मंडळाच्या गणपतीलाही भेट दिली. या गणपतीची स्थापना 1983 पासून केली जाते. भुजबळ या मंडळाला भेट देण्यासाठी आले असता शिवसैनिकांनी ‘कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला’ अशा घोषणा देत फटाक्यांची आतिषबाजी केली. भुजबळांचे जंगी स्वागत केल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांना शिवसेनेत लवकर प्रवेश करून येवल्यातून शिवसेनेच्या तिकिटावर उमेदवारी करावी, असा आग्रह धरला. यावर बोलताना भुजबळांनी मी येवल्यातूनच विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याचं जाहीर केले.
येवल्यातूनच लढण्याचं भुजबळांचं शिवसैनिकांना आश्वासन
शिवसेनेकडून येवला-लासलगाव विधानसभा मतदार संघात आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी शिवसेनेतील इच्छुक उमेदवार संभाजी पवार आणि रुपचंद भागवत प्रयत्न करत आहेत. यासाठी ते दोघेही मातोश्रीच्या पायऱ्या झिजवत आपल्याला तिकीट मिळावे यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मनधरणी करत आहेत. अशावेळी माजी आमदार कल्याणराव पाटील यांनीही उमेदवारीसाठी दावा केला आहे. त्यातच विंचूर पाठोपाठ आता येवला येथील शिवसैनिकांनी भुजबळांना शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी घातलेल्या साकड्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांना शिवसेनेच्या तिकिटावर पाणी सोडावे लागणार असल्याचे चित्र यानिमित्ताने दिसत आहे.
छगन भुजबळ हे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ आपल्या पूर्वनियोजित येवला मतदारसंघातील दौरा घाईत उरकून मुंबईला रवाना झाले होते. त्यावेळी तर त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला होता.
शिवसेनेत परतणार की राष्ट्रवादीला साथ देणार?
छगन भूजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा आधीही झाल्या. त्यानंतर भुजबळांनी त्याला नकार देत राष्ट्रवादीत असल्याचे सांगितले. मात्र, भुजबळ यांच्या भेटीगाठींमुळे त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा वारंवार होत आहे. त्यातच त्यांनी शिवसेनेच्या गणपती मंडळाला भेट दिल्याने ही चर्चा पुन्हा सुरू झाली. अशा स्थितीत राष्ट्रवादीचे प्रमुख नेत्यांपैकी एक छगन भुजबळ काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. भुजबळ स्वगृही शिवसेनेत परतणार की राष्ट्रवादीची साथ देणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.
निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला भगदाड
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला भगदाड पडलं आहे. राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार वैभव पिचड, मधुकरराव पिचड, आमदार दिलीप सोपल, आमदार संदीप नाईक, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, विजयसिंह मोहिते पाटील हे दिग्गज पक्ष सोडून शिवसेना भाजपमध्ये गेले आहेत. तर रामराजे निंबाळकर, उदयनराजे भोसले, धनंजय महाडिक, भास्कर जाधव आणि पवारांचे नातेवाईक पद्मसिंह पाटील हे राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येत आहे.