छत्रपती संभाजीनगर : एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या या टीकेचं शिवसेना ठाकरेगटाचे नेते अंबादास दानवे यांनी समर्थन केलं आहे. तसंच कर्नाटकची निवडणूक, नितीश कुमार यांचा मुंबई दौरा आणि सामनाचा अग्रलेख यावरही अंबादास दानवे यांनी भाष्य केलंय.
नरेंद्र मोदी मोठे कलाकार आहेत हे असदुद्दीन ओवौसी यांचं म्हणणं खरं आहे. नरेंद्र मोदी मोठे कलाकार आहेत. ते अनेक कला करतात. नकला करतात. वेशभूषा करतात. त्यामुळे ते मोठे कलाकार आहेत. या बोटावरचा थुका त्या बोटावर करण्यात नरेंद्र मोदी पटाईत आहेत, असं अंबादास दानवे म्हणाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातले सर्वात मोठे कलाकार आहेत. बॉलीवूडमधल्या चित्रपटांमध्ये काम केलं तर सगळे फिल्मफेअर त्यांनाच मिळतील. ‘केरला स्टोरी’सारख्या चित्रपटाचं ते प्रमोशन करतात. ही मुस्लिम द्वेष करण्याची वाईट पद्धत आहे. हिटलरने सुद्धा 70 लाख ज्यू लोकांना मारलं होतं. इथे पण नरेंद्र मोदी तोच हिंदुत्वाचा अजेंडा राबवात आहेत, असं असदुद्दीन ओवेसी म्हणालेत.
संजय राऊत यांनी लिहिलेला अग्रलेख हा भारतीय जनता पार्टीवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवरती लिहिलेला नाही. सामना हे वृत्तपत्र आहे, त्यात काय लिहायचं आणि काय नाही लिहायचं संपादकांचा तो अधिकार असतो, असं अंबादास दानवे म्हणालेत. संजय राऊत यांना पाठीमागे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत का? असा सुद्धा प्रश्न विचारला गेला होता, त्यावेळेला छगन भुजबळ का नाही बोलले? ही महाविकास आघाडी बनवण्यात संजय राऊत यांचा रोल खूप महत्त्वाचा राहिलेला आहे, असंही ते म्हणालेत.
कर्नाटक निवडणुकीमध्ये एखादा मराठी माणूस जर फुटीर पक्षाकडून उभा असेल तर त्याला कशाला मतदान करायचं? त्या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीने जे उमेदवार दिले आहेत. त्यांनाच मतदान केलं पाहिजे, असं म्हणत दानवे यांनी कर्नाटक निवडणुकीवर भाष्य केलंय.
2024 ला विरोधकांची मोट बांधण्याची बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार प्रयत्नशील आहेत. नीतीश कुमार 11 मेला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार आहेत. त्यावर अंबादास दानवे यांनी भाष्य केलंय. शरद पवार, नीतीश कुमार मोठे नेते आहेत. भारतीय जनता पार्टीच्या विरोधात सगळ्या पक्षांना एकत्र आलं पाहिजे. त्यासाठी नीतीश कुमार प्रयत्न करत आहेत. हे स्वागतार्ह पाऊल आहे, असं दानवे म्हणालेत.