छत्रपती संभाजीनगर | 16 ऑगस्ट 2023 : रानकवी ना. धों. महानोर यांचं काही दिवसांआधी निधन झालं आहे. 03 ऑगस्ट रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या साहित्य वर्तुळ हळहळलं होतं. त्यांच्या जाण्याने शेती-मातीची जाण असणारा कवी हरपल्याची भावना व्यक्त केली गेली. ना. धों. महानोर यांचे मित्र आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. आता आज ना.धों. महानोर यांच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेतली. महानोर यांच्या जाण्यानंतर आज पहिल्यांदाच शरद पवार छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. यावेळी त्यांनी सोयगाव तालुक्यातील पळसखेड या महानोर यांच्या गावी जात सांत्वन केलं.
ना. धों. महानोर हे महाराष्ट्राला साहित्य आणि कविता विश्वातील मोठं नाव. आज ते आपल्यामध्ये राहिले नाहीत. त्यामुळे दुरदृष्टीच्या कविमनाच्या माणसाला आपण मुकलो आहोत, असं शरद पवार म्हणाले. महानोर यांचं काव्यविश्वातील योगदान सर्व जगाला माहीत आहे.परंतु महानोर यांची शेतीसाठी विशेष आस्था आहे. आम्ही चर्चा करताना शेती विषयावर चर्चा होत असे, असं म्हणत शरद पवार यांनी महानोर यांच्या आठवणींना उजाळा दिला.
ना. धों. महानोर यांच्या निधनानंतर त्यांच्या त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काल संध्याकाळी श्रध्दांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शरद पवार, MGM विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अंकुश कदम, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार रोहित पवार हे उपस्थित होते. या कार्यक्रमात शरद पवार यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
नामदेवांसाठी शोक सभेतून कधी जमा होऊ असं वाटत नव्हतं. गेल्या अनेक वर्षांचा माझा आणि त्यांचा घनिष्ठ संबंध आहे. त्यासंबंधाचा प्रतिबंध कधी झाला नाही. ना. धों यांचं कार्य आणि त्यांचं लेखन यासंबंधी जास्त बोलण्याची मला आवश्यकता नाही, पण शेतीच्या क्षेत्रामध्ये जे काही बदल होतात, नवीन संशोधन येत आहेत, शेतकऱ्यांची प्रगती होते यात त्यांचा अधिक अधिक वाटा आहे, असं शरद पवार कालच्या श्रद्धांजली सभेत म्हणाले.
अनेक वेळा आम्ही पुरस्काराला गेलो असू तिथे गेल्यानंतर शेतातली त्यांची बाग असो ज्या विविध पद्धतीची सिताफळे त्यांच्या झाडाला पाहायला मिळीत. शेतीच्या बाहेर एकाही विषयावर आमच्या गप्पागोष्टी होत नसत. जे काही लिखाण झाले ते शेतकरी, त्याची शेती आणि पीक यासंबंधीच असायचे. अलीकडच्या काळात शेतीवरच ते लक्ष केंद्रित करत होते.
अलीकडच्या काळामध्ये महानोर एका वेगळ्या स्थितीत होते. त्यांच्या पत्नी गेल्या आणि त्यानंतर हा गृहस्थ सावरलाच नाही. मी आणि माझी पत्नी आम्ही अनेकवेळा त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशी गप्पा- गोष्टी केल्या. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तो खचला आणि एकदिवशी आपल्यातून निघून गेला. आज त्यांनी जे शेतीच्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठे योगदान दिलेले आहे, ते कधीही विसरलं जाणार नाही, असंही शरद पवार म्हणाले.