छत्रपती संभाजीनगर | 08 ऑगस्ट 2023 : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात बरेच बदल होत आहेत. अशात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे भाऊ एकत्र येणार असल्याची चर्चा होत आहे. यावर आता ठाकरे गटाची प्रतिक्रिया समोर येत आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच शरद पवार यांच्या राजकीय भूमिकेवरही अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे हे दोघे भाऊ आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकवर चर्चा करण्यासाठी एकत्र असतील तर चांगली गोष्ट आहे. राज ठाकरे यांनी शिवसेना प्रमुखांसोबत काम केलं आहे. यासाठी जर भेट होत असेल तर त्याचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही, असं दानवे म्हणाले.
दोघे ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर कुणाला वाईट वाटायचं कारण नाही. राजकारणासाठी त्या दोघांची विचार करायचा तो त्यांचा अधिकार आहे. आम्ही मात्र उध्दव साहेब सांगतील तसं काम करणार आहोत, असंही दानवे म्हणाले.
शरद पवार हेच राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. सध्या पक्ष पातळीवर फुटीरांना धाक राहिला नाही. भाजपचे लोक फुटले असते तर त्यांचं सदस्यत्व टिकलं असतं का? स्वतःच्या फायद्यासाठी कायद्याचा वाट्टेल तसा वापर केला जातो आहे, असं दानवे म्हणाले.
शरद पवार हे एका विचारसारनीने काम करणारे नेते आहेत. ते भाजपसोबत जाणार नाहीत, असा विश्वासही दानवे यांनी व्यक्त केला आहे.
देशात सर्वात जास्त घमंड कुणाला आहे. हे देशालाच नाही जगाला माहिती आहे. मी म्हणजे देश ही वृत्ती कुणाची आहे. जो लढा देशात उभा राहत आहे. तो लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लढा उभा राहत आहे. हुकूमशाही विरुद्ध लढा इंडियाच्या माध्यमातून लढला जात आहे. त्यामुळे येत्या काळात इंडिया आघाडीचाच विजय होईल, असं दानवे म्हणालेत.
शेतकऱ्याच्या बाजूने आवाज उठवत असताना भाजपसोबत जाणं हा रविकांत तुपकर यांच्यासाठी चुकीचा निर्णय ठरेल. देशविघातक शक्ती या काळात वाढत आहेत. प्रदीप कुरुलकर कोण आहे त्याने किती गुपितं फोडली? इसिस मुंबई पश्चिम महाराष्ट्रात कशी पोचली भाजपची दुटप्पी भूमिका आहे, असंही दानवेंनी म्हटलं आहे.