गजानन उमाटे, टीव्ही 9 मराठी, रायपूर : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 72 जागांसाठी आज मतदान झालं. दुसऱ्या टप्प्यात मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली असून, छत्तीसगडवासीयांनी भरभरून मतदान केलं. दुसऱ्या टप्प्यात 65 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालंय. छत्तीसगडचे मंत्री ब्रीजमोहन अग्रवाल, राजेश मूणत, अमर अग्रवाल यांच्यासह भाजप आणि काँग्रेसच्या अनेक दिग्गजांचं भविष्य ईव्हीएममध्ये बंद झालंय. मतदानानंतर आता निकालाची प्रतिक्षा आहे. छत्तीसगडचा गड कोण राखणार, याचा निर्णय येत्या 11 डिसेंबरला होणार आहे.
छत्तीसगड…. गेल्या 15 वर्षांपासून भाजपची एकहाती सत्ता असलेलं राज्य.. पण चौथ्यांदा भाजपचे रमन सिंग मुख्यमंत्री होणार का? की छत्तीसगडमध्ये सत्ताबदल होईल… याचा निर्णय 11 डिसेंबरला होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात झालेल्या 72 जागांवरील मतदानाचा कौल कुणाच्या बाजूने गेला, यावरच छत्तीसगडमध्ये जय पराजयाचं गणित ठरणार आहे. आज सकाळी आठपासूनच छत्तीसगडच्या मतदारांनी लोकशाहीच्या या उत्सवात मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.
पहिल्या टप्प्यात 18 जागांवर मतदान झाल्यानंतर आता दुसरा टप्पा भाजप आणि काँग्रेससाठीही महत्त्वाचा आहे. छत्तीसगडच्या या विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार आणि नक्षलवाद हे प्रमुख प्रचाराचे मुद्दे राहिले, तर भाजपकडून विकासाच्या नावावर मतं मागण्यात आली आणि पुन्हा एकदा भाजपचे नेते ब्रीजमोहन अग्रवाल यांनी चौथ्यांदा भाजपच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.
कशी आहेत छत्तीसगडमधील जातीय समीकरणं?
महाराष्ट्राप्रमाणे छत्तीसगडमध्येही या निवडणुकीत जातीची समिकरणं महत्त्वाची ठरणार आहेत. छत्तीसगडमध्ये साधारण 75 टक्क्यांपेक्षा जास्त ग्रामीण मतदार आहेत.
45 टक्के ओबीसी मतदार
32 टक्के आदिवासी मतदार
11 टक्के दलित मतदार
39 मतदारसंघ राखीव
29 मतदारसंघ एसटीसाठी राखीव
10 मतदारसंघ एससीसाठी राखीव
निम्म्या मतदारसंघावर ओबीसींचं वर्चस्व
छत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्यात पाच वाजेपर्यंत साधारण 65 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालं. 19 जिल्ह्यात 19 हजार जास्त मतदान केंद्रांवर हे मतदान पार पडलं. वृद्ध आणि फर्स्ट टाईम व्होटर यांनीही मतदानाच्या प्रक्रियेत सहभाग घेतला. 101 वर्षीय फुलेबाई आणि त्यांची नात भावना साहू यांनी मतदान केलं. आता सर्वांना प्रतिक्षा आहे ती निकालाची…
91 सदस्यसंख्या असलेल्या छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपने 2013 साली 49 जागा मिळवल्या होत्या. तर काँग्रेसचे 39 आमदार आहेत. त्यामुळे आता छत्तीसगडमध्येही भाजप आणि काँग्रेसमध्ये मोठी लढत होणार आहे.
पाच राज्यांमध्ये निवडणुका
केंद्रीय निवडणूक आयोगाने छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, मिझोराम आणि तेलंगणा या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा केली होती. छत्तीसगडमध्ये 12 आणि 20 नोव्हेंबरला दोन टप्प्यात निवडणूक झाली. तर मध्य प्रदेश आमि मिझोराममध्ये एकाच टप्प्यात 28 नोव्हेंबरला, तर तेलंगणा आणि राजस्थानमध्ये एकाच टप्प्यात 7 डिसेंबरला मतदान होईल. त्यानंतर चारच दिवसात म्हणजे 11 डिसेंबरला पाच राज्यांचा निकाल लागणार आहे.