औरंगाबादः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) केंद्रात जाऊन मुजरा करणारे नेते आहेत. त्यांचा स्वतःचा असा बाणा नाही. भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना चोरून काम करावं लागतंय. ते लपून छपून दिल्लीत जातात. पण शिवसेनेत (Shivsena) सगळं ओपन होतं, अशी घणाघाती टीका शिवसेना आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केली आहे. औरंगाबादेतून त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी होऊन आता एक महिना उलटत आहे. तरीही राज्याचं मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मंत्र्यांचं खातेवाटप आणि पक्षासंबंधी कायदेशीर बाबींसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार दिल्लीत जात आहेत. यावरून त्यांच्यावर विरोधकांकडून तीव्र टीका होत आहे. औरंगाबादचे आमादर अंबादास दानवे यांनीदेखील एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली.
आमदार अंबादास दानवे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केंद्रात जाऊन मुजरा करणारे नेते आहेत. ते काही स्वतंत्र बाण्याचे नेते नाहीत. सध्याचं सरकारने हे असून नसल्यासारखं आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतरही एकनाथ शिंदे यांना चोरून लपून काम करावं लागत आहे. चोरून दिल्लीला जावं लागतंय. शिवसेनेत अशी स्थिती नव्हती. सगळं ओपन होतं. सध्याचं मंत्रिमंडळ दोनच लोकांचं आहे. त्यामुळे त्यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्रात विनोद होत आहेत, असं अंबादास दानवे म्हणाले.
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा नुकताच औरंगाबाद दौरा झाला. जिल्ह्यातील विविध तालुक्यांत त्यांनी शिवसंवाद यात्रा घेतल्या. यावेळी शेकडो शिवसैनिकांची गर्दी जमली होती. शिवसैनिकांचा उत्साह पाहून यांच्या पायखलची वाळू सरकली आहे. आदित्य ठाकरे आले नसते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर सुद्धा आले नसते.. असं वक्तव्य अंबादास दानवेंनी केलंय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्या निमित्त सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार मोठं शक्तिप्रदर्शन करणार असल्याचं बोललं जातंय. यावर अंबादास दानवे म्हणाले, ‘ असे शक्तिप्रदर्शन करण्याची अब्दुल सत्तार यांना नेहमीच सवय आहे. अब्दुल सत्तार लिमिटेड आणि त्यांचा मुलगा समीर सत्तार लिमिटेड आशा कंपन्या आहेत आणि त्यातून हे असे रोडशो आणि शक्तिप्रदर्शन करत असतात. मुख्यमंत्री रोड शो हे पहिल्यांदाच करत आहेत. इलेक्शन मध्ये रोड शो होतात मात्र असे रोड करण्याची परंपरा नाही. आणि गद्दारी केल्यानंतर असं शक्तिप्रदर्शन होतंय, असा घणाघात अंबादास दानवेंनी केला.