या दाढीकडे खूप नाड्या आहेत, हलक्यात घेऊ नका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना इशारा

| Updated on: Feb 07, 2024 | 7:47 PM

कामाच्या जोरावर एकजुटीचे दर्शन घडवायचे आहे. विधानसभा सुद्धा महायुतीने मजबुतीने निवडून आणायची आहे. घरी बसवणाऱ्यांना जनतेने घरी बसवले आहे. संघटना, शिवसैनिक तयार करा, योजना घरी पोहचवा. तुम्ही सर्व एकनाथ शिंदे म्हणून काम करा. मी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत सेवा, विकास करत राहील. बाकी काही नको, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

या दाढीकडे खूप नाड्या आहेत, हलक्यात घेऊ नका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना इशारा
eknath and uddhav
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

धाराशीव | 7 फेब्रुवारी 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे. मी दिवसातून 18-20 तास काम करतो. माझी ऊर्जा, माझं काळीज हे माझे कार्यकर्ते आहेत, ऊर्जा मिळते थकवा दूर होतो. एकही दिवस मी सुट्टीवर गेलो नाही. गावी गेलो की शेतात जातो आणि जबाबदारी पार पडतो. ते फक्त फेसबुक लाइव्ह करतात. मी स्वतः जाऊन दुसऱ्याचा जीव वाचवतो. आरोप करा. तुम्हाला कामाने उत्तर देऊ, असं सांगतानाच तुम्ही अडीच वर्षात माडी उतरला नाहीत. तुमची मगरूरीची दाढी आहे. या दाढीकडे खूप नाड्या आहेत, हलक्यात घेऊ नका, असा सूचक इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशीव येथे बोलत होते. मी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मला विरोध झाला. शेतकरी मुलगा मुख्यमंत्री होऊ नये का? तुमची जहांगीर आहे का? मी संबंधित लोकांना बोलावलं आणि सांगितले की आपल्याला शेतकऱ्यांचं हित पाहायचं आहे, असं सांगतनाच मी समोर बसून सभा ऐकायचो. सामान्यातून मुख्यमंत्री झाला तर त्याचं समाधान मला मिळेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मी पुढचं बोलणार नाही

सामान्य लोकांचे आम्ही जीव वाचवले. तुम्ही अडीच कोटी दिले नाहीत. मी 180 कोटी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दिले. हाती चले बाजार… मी पुढचं बोलणार नाही. टीकेला भीक घालत नाही, असं सांगतानाच मोदी यांनी अनेक योजना आणल्या. अनेक निर्णय घेतले, देशाच्या विकासची गॅरंटी दिली. एका छताखाली सर्व योजना, आरोग्य योजना आणल्या, असंही त्यांनी सांगितलं.

आम्ही आरक्षण दिलं

कुणबी नोंदी असताना दाखले मिळत नव्हते. ते दिले जात आहेत. ज्यांच्याकडे नोंदी नाहीत त्यांना कायद्याच्या चौकटीत बसणारे टिकणारे आरक्षण देण्याचा निर्णय सरकारणे घेतला आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याची निर्णय घेतला. मराठा समाजाने अनेक लोकांना मोठे केले. सत्ता दिली. मात्र या नेत्यांनी संधी असताना मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले हे दुर्दैवी आहे, याची मला खंत आहे. म्हणूनच मी मराठा समाजाला आरक्षण दिलं. आम्ही जो शब्द देतो तो पाळतो. समाजाला न्याय देण्याचे सरकारचे काम आहे, असंही त्यांनी सांगितलं.