सांगली : (Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी दाखल झाले आहेत. दरम्यान, त्यांनी (Sangli) सांगली येथे अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे झालेल्या नुकासानीची पाहणी करुन जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकही घेतली. त्यानंतर सांगलीहून कोल्हापूरकडे मार्गस्थ होत असातना त्यांचा ताफा अचानक भारती हॉस्पीटलकडे मार्गस्थ झाला. या ठिकाणी त्यांनी माजी मंत्री तथा (Vishwajeet Kadam) कॉंग्रेसचे विश्वजीत कदम यांची भेट घेतली. त्यांची ही बैठक बंद खोलीत झाल्याने आता चर्चेला उधाण आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात ही भेट नव्हतीच असे असताना त्यांचा ताफा थेट भारती हॉस्पीटकडे काय रवाना होतो आणि विश्वजीत कदम यांच्यासोबत बंद दाराआड काय चर्चा होते याबाबत आता तर्क-वितर्क लावले जात आहे. चर्चेनंतर सांगली जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर कॉंग्रेसच्या शिष्ठमंडळाने निवदेन दिले पण ते केवळ औपचारिकता असल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री यांच्या नुकसानपाहणीच्या दौऱ्यापेक्षा चर्चा रंगली ती विश्वजीत कदम यांच्यासमवेत झालेल्या बंद खोलीतील चर्चेची. सध्या शिंदे गटाकडून संघटनात्मक बदलही केले जात आहेत. शिवाय या गटामध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत शिवसेना पक्षातूनच अधिकचे इनकमिंग असले तरी अचानक ही बैठक आणि ते ही बंद खोलीत यावरुन तर्क-वितर्क काढले जात आहेत. सुमारे आर्धा तास झालेल्या या बैठकीत नेमकी कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाने थैमान घातले आहे. दोन वर्षापूर्वीही या जिल्ह्यांमध्येच पूरस्थिती निर्माण झाली होती. यंदाही ऑगस्ट महिन्यातच सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस बरसलेला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे तर नुकसान झालेच आहे पण मनुष्याहानीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्याअनुशंगाने मुख्यमंत्री हे सांगली आणि कोल्हापूर दौऱ्यावर होते. नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी झाल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन नुकसानीची स्थिती जाणून घेतली आहे. त्यानंतर कोल्हापूरकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मार्गस्थ झाले आहेत.
कॉंग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर काँग्रेसच्या शिष्ठमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे तर नुकसान झालेच आहे पण ग्रामीण भागात घरांची पडझड झाली असून मनुष्यहानी देखील झाली आहे. त्यामुळे पंचनाम्यांची औपचारिकता न करता थेट नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.