मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या महाराष्ट्र (Maharashtra) दौऱ्याला आजपासून सुरुवात होत आहे. नाशिकपासून (Nashik) या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. आज रात्री मुख्यमंत्री मालेगावला येणार आहेत. त्यानंतर उद्या सकाळी मालेगावमधील विविध विकास कामांचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घेणार आहेत. दरम्यान पहिल्यांदाच नाशिकचे मुख्यालय सोडून मुख्यमंत्र्यांची बैठक ही मालेगावमध्ये होत असल्याने चर्चेला उधाण आले आहे. मात्र मालेगावचे आमदार दादा भुसे हे शिंदे गटात सामील झाल्याने मुख्यमंत्र्यांनी बैठक मालेगावमध्ये ठेवल्याची माहिती समोर येत आहे. आपल्या या दौऱ्यामध्ये एकनाथ शिंदे हे विविध विकास कामांचा आढावा घेणार आहेत. नाशिक महापालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील शिंदे यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
या दौऱ्यामध्ये एकनाथ शिंदे हे मनमाड चौफुलीवरील सुहास कांदे यांच्या कार्यालयाला देखील भेट देणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या औरंगाबाद दौऱ्याला सुरुवात होणार आहे. औरंगाबाद दौऱ्यामध्ये एकनाथ शिंदे हे जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. 30 आणि 31 जुलै असे दोन दिवस एकनाथ शिंदे हे औरंगाबाद दौऱ्यावर असणार आहेत. वैजापूर औरंगाबाद आणि सिल्लोड या तीन तालुक्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भेट देऊन शक्तिप्रदर्शन करणार आहेत. यासोबतच ते शिंदे गटात समील झालेल्या आमदारांच्या घरी देखील भेट देणार आहेत. शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांचीही मुख्यमंत्री भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याची औरंगाबादेत जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. काही दिवसांतच औरंगाबाद महापालिकेची निवडणूक होणार आहे. या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे.
दरम्यान दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील आज नाशिक दौऱ्यावर आहेत. ते आज दुपारी ओझर विमानतळावर दाखल होणार आहेत. त्यानंतर ते उद्या धुळे येथील एका कार्यक्रमाला देखील उपस्थित रहाणार आहेत. शरद पवार यांच्या या दौऱ्यामध्ये आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात काही महत्त्वाच्या बैठका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आज नाशिक दौऱ्यावर असल्याने शिंदे आणि पवार यांची नाशिकमध्ये भेट होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.