मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून, उद्या बहुमत सिद्ध करावे असे म्हटले आहे. आता या सर्व पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi government) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली आहे. आज पाच वाजता या याचिकेवर सुनावणी होणार आहे. मात्र त्यापूर्वी आज होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत खडाजंगी होण्याची शक्यता आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये औरंगाबाद विमानतळास छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. या प्रस्तावाला विरोध झाल्यास मुखमंत्री उद्धव ठाकरे हे आजच राजीनामा देऊ शकतात अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे. सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे आज होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिवसेनेकडून नामकरणाचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केली आहे. शिवसेनेच्या 40 पेक्षा अधिक आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात सापडले असून, अल्पमतात आल्याचे चित्र आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. उद्या बहुमत सिद्ध करावे असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या या पत्रात म्हटले आहे. मात्र सध्या महाविकास आघाडीकडे पुरेसे आमदारांचे संख्याबळ नसल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याविरोधात महाविकास आघाडी सरकारने आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. या याचिकेवर आज सायंकाळी पाच वाजता सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतरच पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.
दरम्यान दुसरीकडे आम्ही या बहुमत चाचणीच्या प्रक्रियेत सहभागी होणार असल्याची घोषणा एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आली आहे. मात्र बहुमत चाचणीत सहभागी होण्यासाठी बंडखोर आमदारांना मुंबईत यावे लागणार आहे. अशा परिस्थितीमध्ये त्याचा मुक्काम कुठे असणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. यावर बोलण्यास बंडखोर आमदारांच्या गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी बोलण्यास नकार दिला आहे. मात्र हे आमदार सुरत, मुंबई किंवा गोव्यामध्ये मुक्काम करू शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य विधानसभा | सत्तेचं गणित |
---|---|
विधानसभेचे एकूण सदस्य | 288 |
दिवंगत सदस्य | 01 |
कारगृहात सदस्य | 02 |
सध्याची सदस्य संख्या | 285 |
एकनाथ शिंदे गटाकडे किती आमदार | 39 |
आता सभागृहाची सदस्य संख्या | 285 |
बहुमताचा आकडा | 143 |
भाजपचं संख्याबळ | भाजप (106)+शिंदे गट (39)+अपक्ष (27)=172 |
मविआचं संख्याबळ | शिवसेना (16)+ राष्ट्रवादी (51)+ काँग्रेस (44)= 111 |
शिंदे गट भाजपसोबत न गेल्यास भाजपकडे किती संख्याबळ? | भाजप (106)+ अपक्ष (27) = 133 |