औरंगाबाद : औरंगाबाद दौऱ्यावर येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना निषेधार्थ काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी घेतला आहे. शेकडो कार्यकर्त्यांसह ते निदर्शनं करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवार आणि रविवारी औरंगाबाद दौऱ्यावर (Aurangabad Visit) आहेत. मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदेंचा हा पहिलाच औरंगाबाद दौरा आहे. औरंगाबादकरांसाठी मुख्यमंत्र्यांचा हा दौरा जास्त महत्त्वाचा आहे कारण शिंदे-फडणवीस सरकारने सत्तारुढ होताच संभाजीनगर नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या अवस्थेत असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीदेखील या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचे मंत्री तसेच शिंदे-फडणवीस सरकारविरोधात एमआयएमने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातही संभाजीनगर नामांतराचा मुद्दा पुन्हा पेटणार, असं दिसतंय. एकनाथ शिंदे यांच्या संभाजीनगर नामांतराच्या विरोधात शेकडो कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरण्याचा इशारा खा. जलील यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री शनिवारी औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. शिंदे सरकारने औरंगाबाद शहराचं नाव बदलल्याच्या निषेधार्थ काळे झेंडे दाखवणार असल्याचं वक्तव्य खा. इम्तियाज जलील यांनी केलंय. नामांतरविरोधी सर्वपक्षीय कृती समितीने अशा प्रकारे निषेध व्यक्त करणार असल्याचे सांगितले आहे. एमआयएमच्या असंख्य कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार असल्याचं खा. जलील यांनी सांगितलं.
cया दौऱ्यात अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदार संघात मोठा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठं शक्तिप्रदर्शन करणार असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे सिल्लोडकडे औरंगाबादमधील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.
मागील आठवड्यात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे औरंगाबादेत येऊन गेले. त्यांच्या मेळाव्यांना शेकडो शिवसैनिकांनी गर्दी केली. शिवसेनेचा हा वाढता प्रतिसाद पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पायाखालची वाळू सरकली, त्यामुळेच त्यांनी औरंगाबाद दौरा आखल्याचा आरोप शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी केला आहे. शिंदे गटाने कितीही शक्ति प्रदर्शन केलं तरीही येथील शिवसेनेला फरक पडणार नाही. शिवसेनेचा हा गड अबाधित राहील. तसेच शनिवारी आणि रविवारच्या शिंदेंच्या मेळाव्याला पैसे देऊन लोक बोलवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.