मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे कालपासून नॉटरिचेबल होते. ते आज सुरतमध्ये असल्याचे समोर आले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे 35 आमदार असल्याचा दावा भाजपाच्या वतीने करण्यात येत आहे. दरम्यान आता शिवसेनेकडून (shivsena) एकनाथ शिंदे यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू असून, माजी मंत्री संजय राठोड (Sanjay Rathore) हे मध्यस्थी करण्यासाठी सुरतला जाणार आहेत. आता या सर्व घडामोडींवर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी खोचक ट्विट केले आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये काही फुटले, आज तेरा गेले यालाच तीन तेरा वाजणे असे म्हणतात असं ट्विट चित्रा वाघ यांनी केले आहे. चित्रा वाघ यांच्यापूर्वी भाजप नेते अनिल बोंडे यांनी देखील याच मुद्द्यावरून शिवसेनेवर टीका केली होती.
काल काल काही फुटले
आज १३ झाले
यालाच तीन तेरा वाजणे म्हणतात…. pic.twitter.com/JCC0qr2r6f— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 21, 2022
अनिल बोंडे यांनी शिवसेनेसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. उद्धव ठाकरे यांचे त्यांच्याच पक्षावर नियंत्रण नसल्याचे बोंडे यांनी म्हटले होते. उद्धव ठाकरे यांना आमदारांवर नियंत्रण ठेवता येत नाही. महाविकास आघडाीमधील घटक पक्षांवर देखील त्यांचे नियंत्रण नसल्याचे बोंडे यांनी म्हटले होते. एकनाथ शिंदे यांनी वेळोवेळी आपली निष्ठा सिद्ध केली आहे. तरी देखील त्यांच्यावर संशय घेण्यात आला. आता हाच संशय शिवसेनेला भोवण्याची शक्यता असल्याचे बोंडे म्हणाले होते.
शिवसेना नेते आणि माजी मंत्री संजय राठोड हे आता मध्यस्थी करण्यासाठी सुरतला जाणार आहेत. ते एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. मध्यस्थी यशस्वी झाल्यास काही प्रश्नच नाही. मात्र मध्यस्थी होऊ न शकल्यास एकनाथ शिंदे हे आज रात्री आपला निर्णय जाहीर करणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्याबाबतीत दोन शक्यता वर्तवण्यात येत आहेत. एक म्हणजे ते भाजपामध्ये प्रवेश करणार किंवा नव्या पक्षाची घोषणा करणार. दरम्यान सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावे आणि मी उपमुख्यमंत्री बनावण अशी इच्छा देखील शिंदे यांनी व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे.