मुंबईः कामाचा भाग म्हणून किंवा व्यवसायाची गरज म्हणून कोणते कपडे घालावेत, यावर आक्षेप घ्यायचं कारण नाही. पण समाजात वावरताना आपला पेहराव व्यवस्थित राखणं हे सामाजिक भान आहे. पण सामाजिक भानच राखलं जात नसेल तर त्याला नंगट मानसिकता का म्हणू नये, असा सवाल भाजप (BJP) महिलाआघाडीच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केलाय. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या प्रतिक्रियेवर चित्रा वाघ यांनी हा प्रतिप्रश्न केलाय.
अभिनेत्री उर्फी जावेदच्या कपड्यांवरून चित्रा वाघ यांनी सातत्याने टीका सुरु केली असून उर्फी जावेदनेही चित्रा वाघ यांना महिला सुरक्षेच्या प्रश्नांवरून घेरलंय. सुषमा अंधारे यांनी या दोघींच्या वादात उडी घेतली. काल त्यांनी यावरून एक फेसबुक पोस्ट शेअर केली.
मला साडी नेसालया आवडते. कारण मला त्यात कम्फर्टेबल वाटतं. पण म्हणून इतरांनी हाच पेहराव करावा, असा माझा अट्टहास अजिबात नसतो. प्रत्येकाच्या व्यवसायाची ती गरजसुद्धा असते, अशी भूमिका सुषमा अंधारे यांनी मांडली.
उर्फी जावेदसारख्या अल्पसंख्याक समुदायातील महिलेला मारहाण करण्याची भाषा वापरण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? असं असेल तर तुम्ही कंगना राणावत, केतकी चितळे किंवा अमृता फडणवीस यांच्या वेशभुषेवर आक्षेप घेऊ शकाल का, असा सवाल काल सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्टद्वारे केला.
आपल्या कामाची गरज म्हणून कोणाचा पेहराव तसा असेल तर तो झाला कामाचा भाग यावर माझा किंवा कोणाचाही आक्षेप असायचं कारण नाही पण जिथे आपण समाजात वावरतो,सार्वजनिक ठिकाणी भर वस्ती आणि रस्त्यावर खुल्या वातावरणात आपला पेहराव व्यवस्थित राखणं हे सामाजिक भान आहे…(1/5)
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 3, 2023
चित्रा वाघ यांनी आज ट्विटरवरून त्याला प्रत्युत्तर दिलंय. व्यक्तीस्वातंत्र्याचा सन्मान न राखता, त्याचा अतिरेक करणाऱ्यांना रोखणं हा ही धर्म नाही का? लेकी बाळी तर आपल्या प्रत्येकाच्याच घरी आहे, त्यांच्यासमोर असे आदर्श असावेत का? असा सवाल चित्रा वाघ यांनी केलाय.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी प्रश्न उपस्थित केला. स्त्री शिक्षित व्हावी, सक्षम व्हावी, यासाठी लढा देणाऱ्या सावित्रीमाईंनाही स्वैराचाराला प्रोत्साहन देणाऱ्या अशा लेकी अभिप्रेत होत्या का?
जिथे समाजस्वास्थ्य महत्त्वाचं, तिथे राजकारण करण्याची गरज आहे का? असे उपद्व्याप रोखण्यासाठी एक होऊ या, छत्रपतींचा आदर्श, सावित्रीचे संस्कार जपूया, असं आवाहन चित्रा वाघ यांनी केलंय.