मुंबई : खरी शिवसेना कुणाची यावरुन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) विरुद्ध ठाकरे (Thackeray) असा संघर्ष राज्यात सुरु आहेच. वेगवेगळ्या पातळीवर राज्यातही त्याचे पडसाद पाहायला मिळाले होते. आता तर हा वाद टोकाला गेल्याचं दिसून येतंय. शनिवारी रात्री उशिरा शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि शिवसैनिक भिडलेत. महत्त्वाचं म्हणजे यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केला, असा आरोप करण्यात आला आहे. आमदार सदा सरवणकर (MLA Sada Saravankar) यांनी मात्र आपल्यावर केलेले आरोप माध्यमांशी बोलताना फेटाळून लावलेत. एका घरगुती प्रकरणाचा वाद झाल्याचं सरवणकर यांनी म्हटलंय.
प्रभादेवीमध्ये शुक्रवारी शिंदे विरुद्ध शिवसेना गट आमनेसामने आले होते. गणपती विसर्जन मिरवणुकीत सदा सरवणकर हे मनसेच्या व्यासपीठावरही दिसून आले होते. दरम्यान, हा वाद शनिवारी आणखी टोकाला गेला. शिंदे गटातील शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांना शिवसेना कार्यकर्त्यांनी चोप दिला. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. अखेर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केल्याची माहिती समोर आली आहे.
शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी गंभीर आरोप केला आहे. सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप सुनील शिंदे यांनी केलाय. या गोळीबारात एक पोलीस जखमी होता होता वाचल्याचंही ते म्हणाले. दादर पोलीस स्थानकाच्या आवारात सरवणकर यांनी गोळीबार केला, असा त्यांनी आरोप केलाय.
शिवसेनेकडून गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी स्वागत कक्ष उभा करण्यात आला होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वागत कक्ष उभारला गेला होता. पण शिंदे गटातील शाखा प्रमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना हे सहन झालं नाही, असा आरोप सुनील शिंदे यांनी केला आहे. त्यावरुनच हा वाद झाला. शिवसेनेच्या नगरसेवकांना शिंदे गटाचे कार्यकर्ते नको त्या भाषेत बोलत असतात. त्यांना सत्तेचा माज आला आहे. सोशल मीडियावरही आक्षेपार्ह भाषा वापरली जात असल्याचंही सुनील शिंदे यांनी म्हटलंय. दरम्यान, यावेळी आपल्या असलेल्या पिस्तुलाचा गैरवापर सदा सरवणकर यांनी केल्याचंही सुनील शिंदे म्हणाले.
दरम्यान, सदा सरवणकर यांनी आपल्यावर करण्यात आलेले फेटाळून लावले. घरगुती वाद झाल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यातून हा सगळा हाणामारीचा प्रकार घडल्याचं शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी म्हटलं आहे.