रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झालाय. अशातच रायगड लोकसभा मतदारसंघातली निवडणूक विशेष लक्षवेधी ठरत आहे. याला कारण आहे, रायगड लोकसभा मतदारसंघातील रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेची अंतर्गत गटबाजी. शिवसेनेचे दोन दिग्गज नेत्यांचे गट कुणाच्या बाजूने उभे राहतात यावर इथली विजयाची समीकरणे अवलंबून असतील. शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यातील हाडवैर काही नवीन नाही. त्यामुळे केवळ दोन हजार मतांनी निवडून आलेल्या केंद्रीय मंत्री अनंत गीतेंसाठी ही निवडणूक तेवढी सोपी असणार नाही.
रामदास कदम आणि सूर्यकांत दळवींचा वाद चव्हाट्यावर
रायगड लोकसभा मतदारसंघातील महत्वाचा भाग गणला जातो तो म्हणजे दापोली विधानसभा मतदार संघ.. राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी इथं सरळ लढत असणार आहे. राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते सुनील तटकरे आणि तब्बल सहा वेळा खासदार म्हणून निवडून गेलेले अनंत गीते निवडणूक रिंगणात असणार आहेत. मात्र 2014 च्या निवडणुकीत गीतेंचा अवघ्या दोन हजार मतांनी विजय झाला होता. मात्र आता 2019 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा गीतेंना विजय तेवढा सोपा असणार नाही. याला कारण शिवसेनेच्या नेत्यांमधील अंतर्गत वाद. तब्बल पाच वर्ष शिवसेनेच्या तिकिटावरून आमदार झालेले सूर्यकांत दळवी सध्या नाराज आहेत. त्यात दळवी आणि रामदास कदम यांच्यातील वाद वाढत चाललाय.
लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि दापोली विधानसभेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यातील वाद शिवसेनेच्या विजयाच्या अडसर ठरू शकतो. गेल्या वर्षापासून सूर्यकांत दळवी आणि रामदास कदम यांच्यातील वाद धुसफुसतोय. त्यामुळे या वादात या दोन्ही गटाची मते गीतेंच्या पारड्यात पडली तरच गीतेंचा विजयातला मोठा अडसर दूर होऊ शकतो. सूर्यकांत दळवी यांनी थेट रामदास कदम यांना पुढील विधानसभा निवडणुकीत आपल्याला पाठिंबा देण्याचं आवाहन करत रामदास कदम यांना फटकारलं होतं.
सूर्यकांत दळवी शिवसेनेत नाराज
सूर्यकांत दळवी सध्या शिवसेनेत नाराज आहेत. त्यामुळे खेड दापोली मतदारसंघातून रामदास कदम यांना आपला मुलगा योगेश कदमला निवडून आणायचं आहे. त्यामुळे अत्तापासून सूर्यकांत दळवींचा पत्ता कट करण्यासाठी रामदास कदम आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी पाहायला मिळतात. भाजपमध्ये प्रवेश करण्यसाठी शिवसेना माजी आमदार सूर्यकांत दळवी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलेला दिवस सुद्धा रामदास कदम यांनी सांगितला. त्यामुळे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर हल्लाबोल करणाऱ्या सूर्यकांत दळवी यांच्याविरोधात आता रामदास कदम यांनी दंड थोपटलेले पाहायला मिळतंय.
दापोली विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून इच्छुक असलेले योगेश कदम यांनीही जाहीर मेळाव्यात सूर्यकांत दळवींना आव्हान दिलं. अंगावर आलात तर शिंगावर घेणार, असा इशारा योगेश कदम यांनी सूर्यकांत दळवींना जाहीर भाषणातून दिला होता.
गीतेंचा मार्ग खडतर
विरोधक असलेल्या गीतेंचा राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी सुद्धा समाचार घेतलाय. गीते आणि रामदास कदम यांच्यातील वाद सुद्धा राजकारणात नवीन नाही. त्यामुळे हाच मुद्दा पकडत औरंगाबादमध्ये केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी केलेल्या वक्तव्याचा हवाला तटकरे यांनी देत, रामदास कदम आणि गीतेंवर टीका केली. गीतेंना पाडण्यासाठी रामदास कदम यांनी पुढाकार घेतला होता. त्यानंतर गीतेंची माफी मागण्यासाठी रामदास कदम आले होते, त्यामुळे गीतेंची माफी मागण्यापर्यंत रामदास कदम लाचार का झाले, असा सवाल तटकरेंनी उपस्थित केला.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत अनंत गीते यांचे प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे हे अवघ्या 2110 मतांनी पराभूत झाले. पण गेल्या पाच वर्षांत राजकीय समीकरणे बदलली आहेत. 2014 च्या निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये शेकापच्या उमेदवाराने सव्वा लाखाहून अधिक मतं घेतली होती. पण यावेळी मात्र शेकाप तटकरे यांच्या बाजूने आहे. त्यामुळे शिवसेनेला एकेका मतासाठी झगडावं लागणार आहे आणि अशातच शिवसेनेतील दोन दिग्गज नेते असलेले सूर्यकांत दळवी आणि रामदास कदम यांच्यात सध्या विस्तव देखील जात नाही. त्यामुळे या दोन राजकीय नेत्यांचा तिढा शिवसेनेला या लोकसभेच्या विजय हवा असेल तर नक्कीच परवडणार नाही.