मावळमध्ये भाजप-शिवसेनेचं जमेना, वाद पार्थ पवारांच्या पथ्यावर?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसने मावळमधून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी दिली. पार्थ पवारांसाठी राष्ट्रवादीने मावळमध्ये जाहीर सभा घेऊन प्रचाराचा नारळही फोडला. पण भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यातील वादामध्ये मात्र कार्यकर्त्यांची गोची झाली आहे. श्रीरंग बारणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशाने प्रचाराला सुरुवातही केली आहे. आकुर्डीमध्ये कार्यकर्ता […]

मावळमध्ये भाजप-शिवसेनेचं जमेना, वाद पार्थ पवारांच्या पथ्यावर?
Follow us on

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसने मावळमधून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी दिली. पार्थ पवारांसाठी राष्ट्रवादीने मावळमध्ये जाहीर सभा घेऊन प्रचाराचा नारळही फोडला. पण भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यातील वादामध्ये मात्र कार्यकर्त्यांची गोची झाली आहे. श्रीरंग बारणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशाने प्रचाराला सुरुवातही केली आहे.

आकुर्डीमध्ये कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी भाजप आणि शिवसेनेचेही नेते उपस्थित होते. मावळ आणि शिरुर हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेकडे असून बूथप्रमाणे काम होईल, असं भाजप नेते आणि मंत्री गिरीश बापट यांनी स्पष्ट केलं.

कार्यकर्ता मेळाव्याला आमदार लक्ष्मण जगताप यानी दांडी मारली. त्यामुळे उलटसुलट चर्चा रंगल्या. याच कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी खोडसाळपणा करत काही पत्रे वाटण्याचा प्रयत्नही केला, ज्यामुळे शिवसेना-भाजपात ऑल इज वेल नसल्याचं पाहायला मिळतंय.

काय आहे पत्र?

श्रीरंगाचे हात दाखवून अवलक्षण… 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदार संघातील भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार बारणे यांचा मागच्या वेळेस बेडकाचा बैल दाखवून भोकाडी दाखवण्याचा कार्यक्रम चांगलाच यशस्वी झाला खरा… पण त्यानंतर 5 वर्षे या गड्याने संसदरत्न नावाखाली झोपूनच काढली. प्रत्यक्ष मतदार संघातील यक्ष प्रश्नाबाबत कुठलेच ठोस निर्णय महाशयांना घेता आले नाही. कायम स्वार्थाचे राजकारण करणाऱ्या बारणेंनी ज्या कलाटेनी त्यांच्या उमेदवारी आणि विजयासाठी जीवाचे रान केले, त्याचाच पहिला तळीभंडार करण्याचा प्रयत्न केला. विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत चक्क त्यांच्याविरोधात उघड प्रचार केला. मनपाच्या निवडणुकीत स्वतः त्यांच्या वॉर्डात राष्ट्रवादीशी भ्रष्ट युती केली. त्यामुळे स्वतःच्या गावातला पॅनल ही ते निवडून आणू शकले नाहीत. पडे तो भी टांग उपर या म्हणी प्रमाणे होवू घातलेल्या यंदाच्या लोकसभा निवडणुकीत या नटरंगाणे उद्धव ठाकरेंचा कोणताही अधिकृत निरोप नसताना, पक्षाच्या सर्व्हेत पूर्ण निगेटिव्ह रिपोर्ट असताना…. त्याची कारणे ही तशीच आहेत. कारण खासदार झाल्यावर शिवसैनिकांची कमी आणि राष्ट्रवादीची धुणीभांडी धुण्यात या महाशयांनी पाच वर्षे घालवली. असं असताना कायम शिवबंधन असलेला सच्चा शिवसैनिक असल्याचा कायम खोटा आव आणला. याच बोगस वागण्यातून काल सोनई मंगल कार्यलयात स्वतःला अधिकृत स्वयंघोषित खासदारकीचा उमेदवार म्हणणाऱ्या बारणेच्या सभेला फक्त 250 कार्यकर्ते उपस्थित होते. पाच वर्षे स्वपक्षीयांकडे दुर्लक्ष आणि आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीसोबत चाललेली मॅचफिक्सिंग मात्र जनतेच्या लक्षात आली आहे. कारण लोकसभेत पराभूत होऊन विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर चिंचवड विधानसभा लढण्याचा शब्द राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्टींकडून घेऊन बसला आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना माझी पोट तिडकीने विनंती आहे की वाघाचे कातडे घालून कुणी वाघ होत नाही. मोदी साहेबांना पंतप्रधानपदी पुन्हा एकदा विराजमान होण्यासाठी एक एक सीट महत्वाची असताना अशा खंडोजी खोपडेंना तिकीट जाऊन युतीचे कधीही न भरून येणारे नुकसान होणार आहे. युतीचा खंदा समर्थक आणि मोदी साहेबांचा चाहता म्हणून हाताच्या कंकणाला आरसा कशाला? म्हणून हा सर्व मागोवा तुमच्या समोर ठेवत आहे.

जय हिंद जय महाराष्ट्र.