मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात विधानभवनात बैठक झाली. शिवसेना आणि भाजपच्या आमदारांचीही बैठकीला उपस्थिती होती. युतीमध्ये विविध नेत्यांच्या वक्तव्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होती. केवळ अर्धा तास चाललेल्या या बैठकीत काय ठरलं असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला, ‘पत्रकारांना काहीही बोलायचं नाही’, असं या बैठकीत ठरल्याचं उद्धव ठाकरेंनी मिश्कीलपणे सांगितलं.
शिवसेना आणि भाजप युतीने लोकसभेत घवघवीत यश मिळवलं असलं तरी विधानसभेपूर्वी जागा वाटपाचा मुद्दा असो, किंवा मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा, यावरुन विविध नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळेच उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेत आमदारांची बैठक घेतली.
दरम्यान, शिवसेना-भाजप युती, जागावाटप आणि मुख्यमंत्री पद याबाबत जो कुणी गैरसमज पसरवेल त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा निर्णय उद्धव ठाकरे आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी घेतल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपाध्यक्ष अमित शाह आणि माझं बोलणं झालंय. त्यामुळे कुणीही मध्ये नाक खुपसण्याची गरज नाही, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतंच स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता युतीमध्ये जो कोणी मिठाचा खडा टाकेल त्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा निर्णय घेतला आहे. याबाबत उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात फोनवर चर्चा झाली. त्यावेळी शिवसेना आणि भाजप युती, जागावाटप आणि मुख्यमंत्री पद याबाबत गैरसमज पसरवणाऱ्यांवर शिस्तभंग कारवाई करण्यात येईल, असा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
VIDEO :