मुंबई : युतीचा फॉर्म्युला जाहीर करतानाच मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडल्याचं चित्र आहे. कारण, आदित्य ठाकरेंचं हे वैधानिक निवडणुकीतलं पहिलं पाऊल आहे, पहिलं पाऊल टाकताच मुख्यमंत्री व्हायचं यावर बोलण्यापेक्षा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होणं हे महत्त्वाचं आहे, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Mahayuti) यांनी स्पष्ट केलं. आदित्य मुख्यमंत्री व्हावा ही शिवसैनिकांची इच्छा असेल, तर त्यात काही गैर नाही, असंही ते (Uddhav Thackeray Mahayuti) म्हणाले.
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत महायुतीची अधिकृत घोषणा केली. बंडखोरी टाळण्यासाठी महायुतीने उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर फॉर्म्युला जाहीर केला. पण अनेक ठिकाणी बंडखोरी झाली आहे. दोन दिवसात बंड थंड होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
महायुतीचा फॉर्म्युला
महायुतीची घोषणा करण्यासाठी इतर पक्षाचे नेते उपस्थित नव्हते. पण आज उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असल्याने सर्व नेते त्यात व्यस्त असल्याने येऊ शकले नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महायुतीमध्ये शिवसेना 124, मित्रपक्ष 14 आणि भाजप उर्वरित सर्व जागा (150) लढवत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.
“बंडखोरांना विश्वासात घेणार”
मतदारांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. पुढच्या दोन दिवसात नेत्यांना विश्वासात घेतलं जाईल, जो माघार घेणार नाही त्याला महायुतीत कोणतंही स्थान मिळणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.
ज्येष्ठ नेत्यांचं तिकीट का कापलं?
भाजपने एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यांसारख्या महत्त्वाच्या नेत्यांचं तिकीट कापलंय. यावर मुख्यमंत्री म्हणाले, “तिकीट दिलं नाही म्हणून पत्ता कट झाला असं होत नाही. राजकारणात भूमिका आणि जबाबदाऱ्या या बदलत असतात.”
शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा सोडली?
युतीमध्ये शिवसेना भाजपपेक्षा कमी (124) जागा लढवत आहे. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “आकड्यांवर सर्व काही अवलंबून नसतं. युती झाल्यावर पुढचं सगळं ठरवता येतं. लोकसभेच्या अगोदर जे वातावरण होतं ते आता राहिलेलं नाही, आमही सर्व गोष्टी मनापासून करतोय. पहिल्यापासून जो प्रश्न होता युती होईल की नाही, जो आम्ही समजूतदारपणाने सोडवलाय. यात लहान भाऊ मोठा भाऊ नव्हे, तर भावाचं नातं टिकणं महत्त्वाचं आहे. निवडणुका, निकाल आणि त्यानंतर सत्तेमध्ये न भांडता, जे ठरलं आहेत, ते पुन्हा पुन्हा जाहीर करण्याची गरज नाही.”
“आदित्य मुख्यमंत्री व्हावा ही शिवसैनिकांची भूमिका असेल तर त्यात काही गैर नाही. वैधानिक निवडणुकांमध्ये पहिलं पाऊल टाकत असेल तर पहिलंच पाऊल म्हणजेच मुख्यमंत्री व्हायचं, उद्या काय व्हायचं… त्यापेक्षा त्याचं स्वप्न काय आहे ते विचारा, त्याचं स्वप्न हेच आहे की महाराष्ट्र सुजलाम सुफलाम घडवायचाय,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.