कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचा धुरळा बसतो ना बसतो तोच राज्यात विधानसभेची धुळवड सुरु झाली आहे. त्याची पहिली झलक कोल्हापूरच्या कागलमध्ये पाहायला मिळाली. भाजप-शिवसेना युतीचा राज्यातील पहिला उमेदवार जवळपास घोषित झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तसे संकेत दिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल कोल्हापूर दौऱ्यावर होते. कागल साखर कारखान्याचे चेअरमन स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्याचं अनावर कागल याठिकाणी झालं. यानंतर झालेल्या सभेत मुख्यमंत्र्यांनी विक्रमसिंह घाटगेंचे सुपुत्र समरजितसिंह घाटगे यांना काम करत राहण्याचा सल्ला दिला. एवढंच नाही तर ज्या सभागृहात आपल्याला काम करण्याची इच्छा आहे, त्यासाठी देखील जनता आशीर्वाद देईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षरित्या समरजितसिंह घाटगे यांची विधानसभेसाठी उमेदवारीच घोषित केली.
CM @Dev_Fadnavis praised various social initiatives by Late Raje VikramSingh Ghatge for the people. He set up various institutions to change the lives of farmers.
Schools for divyang, orphanages shows his sensitivity for the deprived; CM said. pic.twitter.com/IoNzRYR0a5— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 13, 2019
कागलमध्ये राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांचे राजकीय वैर टोकाला पोहोचलं आहे. मुख्यमंत्री कागलमध्ये येत असताना ‘परमनंट आमदार’ म्हणून हसन मुश्रीफांचे पोस्टर लागले. मुश्रीफांच्या ‘परमनंट आमदार’ला राजेंच्या कार्यकर्त्यांनी भावी आमदार म्हणून प्रत्युत्तर दिलं. हाच धागा पकडत मुख्यमंत्र्यांनी थेट व्यासपीठावरुन मुश्रीफांना टोला हाणला.
कोणीही पर्मनंट आमदार नसतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
समरजितसिंह घाटगे यांनी गेल्या चार वर्षांपासूनच विधानसभेसाठी राजकीय पेरणी सुरु केली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची त्यांना समर्थ साथ लाभली आहे. त्यामुळेच दादांनीही थेट मुख्यमंत्र्यांना समरजितसिंह यांना युतीचा उमेदवार घोषित करण्याची विनंती केली. इतकंच नाही तर राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आलेला आमदार देखील समरजितसिंह असतील असा विश्वास दिला.
मुख्यमंत्र्यांचा सल्ला, महसूल मंत्र्यांनी केलेली तिकिटासाठी शिफारस, यामुळं समरजितसिंह घाटगे यांनीदेखील उपस्थित जन समुदायाला भावनिक साद घातली. स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांनी शेवटच्या दिवसात कागलबद्दल काढलेल्या उदगाराची आठवण समरजितसिंह यांनी बोलून दाखवली.
युतीच्या जागा वाटपाचा किंवा सत्तेतील सहभागाचा तिढा कधी सुटतो माहित नाही. मात्र कोल्हापूरच्या कागलपासून भाजपनं प्रचंड आक्रमक होण्याचा पवित्रा घेतल्याचं दिसतंय. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचं बलाढ्य नेतृत्व म्हणजे आमदार हसन मुश्रीफ. यांनाच चक्रव्ह्यूहात अडकवून जिल्ह्यात युतीचाच दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या तरी सेना-भाजप करताना दिसत आहे.