सातारा : शिवेंद्रराजे आणि उदयनराजेंनी भाषणादरम्यान काही मागण्या केल्यात. या मागण्यांची आता काळजी करण्याचं कारण नाही. कारण “छत्रपतींनी मागण्या करायच्या नाहीत, तर आदेश द्यायचा असतो आणि छत्रपतींचा आदेश हा मावळा पूर्ण करेल”, असे मुख्यमंत्र्यांनी (CM Devendra Fadnavis Satara Speech) सांगितले. “इतिहासात जेव्हा जेव्हा एखाद्या मावळ्याने चांगली काम केली आहेत, तेव्हा तेव्हा छत्रपतींनी पगडी घालून त्यांचे कौतुक केलं आहे. आज मला उदयनराजे यांनी पगडी घातली तर शिवेंद्रराजेंनी मला तलवार दिली,” असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis Satara Speech) यांनी साताऱ्यातील महाजनादेश यात्रेदरम्यान केले.
प्रजा हीच राजा आहे. त्यांच्यासमोर आम्ही लेखाजोखा मांडला. सर्व राजे आणि आमदार आलेत त्यामुळे आता विरोधक नाही. काही लोक आम्हाला विचारतात यात्रा कशाला काढतात. त्यामुळे आम्ही विरोधात असताना आम्ही संघर्ष यात्रा आणि सत्तेत असताना आल्यावर आम्ही संवाद यात्रा काढतो असे मुख्यमंत्र्यांनी (CM Devendra Fadnavis) सांगितले.
“सातारा जिल्ह्यातील दुष्काळाचा ठपका संपवायचा आहे. त्यामुळे दुष्काळी भागाला पाणी द्यायचं आहे. तसेच जिल्ह्यातील नगरपालिकेमध्ये लवकरच आम्ही बेघर व्यक्तींना घर देणार आहोत आणि हे राज्य बेघर मुक्त करणार आहोत,” अशी महत्त्वपूर्ण घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
भाजप येण्यासाठी आम्ही दोन्ही राजेंना आग्रह केला नाही किंवा त्यांना कोणतीही अट घातली नाही. ते दोघेही जनतेच्या विकासासाठी भाजपमध्ये आलेत. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना शिवेंद्रराजे आणि उदयनराजे चांगले वाटायचे. मात्र आज अचानक ते त्यांच्या नावाने शंख फुकतात. मात्र छत्रपतींचे घराणं हे घेणारे नव्हे, तर देणारे घराणं आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी (CM Devendra Fadnavis) राष्ट्रवादीच्या नेत्यांना लगावला
“तुम्हाला या घराण्यांनी खूप दिलं आहे. तुम्ही त्यांना काय दिलंत. मात्र तुम्ही त्यांच्यावर जे प्रश्नचिन्ह उपस्थित केलात, त्यांचं उत्तर राज्यातील जनता देईल”, असेही त्यांनी राष्ट्रवादीला खडसावले.
“उदयनराजेंनी आणि शिवेंद्रराजेंनी केलेली मागणी ही आमच्यासाठी आदेश आहे. त्यासाठी आज रस्त्यासाठी 50 कोटी रुपये मी जाहीर करतो. तसेच वैद्यकीय प्रवेश येत्या शैक्षणिक वर्षात सुरु होतील आणि इमारतींचे रखडलेले कामही लवकरच होईल. असेही त्यांनी सांगितले. त्याशिवाय छत्रपतींचा मान कधीही कमी होऊ देणार नाही, त्यांच्या मागण्या मान्य होतील”, असेही ते यावेळी म्हणाले.