नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी रात्री एक वाजता दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांची बैठक झाली. या बैठकीबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी युतीबाबत सकारात्मक चर्चा केली आणि धनगर आरक्षणाची मागणी केली. तर लोकसभा निवडणुकीचा अहवालही सादर केला.
मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर असताना एक दिवस अगोदरच मुख्यमंत्री दिल्लीत गेले. बैठकीबाबत जी गुप्तता पाळण्यात आली, त्यावरुन अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. टीव्ही 9 मराठीला मिळालेल्या एक्स्क्लुझिव्ह माहितीनुसार, वरील तीन मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली.
धनगर आरक्षण हा राज्य सरकारसाठी गंभीर विषय बनलाय. पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाचा प्रश्न सोडवू, असं आश्वासन भाजपने सत्ता येण्याअगोदर दिलं होतं. पण चार वर्ष उलटल्यानंतरही धनगर समाजाला मागणीसाठी आंदोलनाची वेळ येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता केंद्रीय पातळीवर हालचाली सुरु केल्या आहेत.
युतीशिवाय राज्यात सत्ता मिळवणं कठीण असल्याचं मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येतंय. कारण, एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येत आहे. तर शिवसेना आणि भाजपच्या मतांचं विभाजन होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी युतीबाबत चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक होती, अशी माहिती आहे.
लोकसभा निवडणुकीबाबत भाजपची राज्यात तयारी सुरु आहे. या तयारीचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी पक्षाध्यक्षांकडे सुपूर्द केला.