नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या राजीनाम्याची खिल्ली उडवली. राहुल गांधी स्वत:लाच स्वत:चा राजीनामा देतील, असं मुख्यमंत्री म्हणाले. सध्या लोकसभा निकालानंतर काँग्रेसमध्ये हाहाकार सुरु आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीकडे राजीनामा सोपवला, मात्र तो फेटाळण्यात आला.
त्याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारलं असता, ते म्हणाले ” प्रत्येकवेळी हरलेल्या व्यक्तीने आत्मचिंतन करणे योग्य असते, राहुल गांधी स्वत:च स्वत:ला राजीनामा देतील. त्यांनी आत्मपरीक्षण केलंच पाहिजे. त्यांनी राजीनामा द्यावा की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. मी त्याबद्दल बोलणार नाही. पण प्रत्येकवेळी हरलेल्या व्यक्तीने आत्मचिंतन करणे योग्य असतं, ते त्यांनी करावं”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
राहुल गांधींचा राजीनामा
राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनाम दिला. काँग्रेस कार्यकारिणीकडे हा राजीनामा सोपवल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र काँग्रेस कमिटीने तो फेटाळला. देशभरात लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरु झालं आहे. काँग्रेस वर्किंग कमिटी अर्थात काँग्रेस कार्यकारिणीची आज बैठक झाली. या बैठकीला UPA च्या अध्यक्षा सोनिया गांधी, प्रियांका गांधी, नाना पटोले, मोतीलाल वोरा, के सी वेणुगोपाल, रजनी पाटील, गिरीजा व्यास, मुकुल वासनिक, पी सी चाको, अशोक गहलोत, अविनाश पांडे, गुलाम नबी आजाद, मल्लिकार्जुन खर्गे, कॅप्टन अमरिंदर सिंह हे उपस्थित होते.
राजीनाम्याची गरज नाही – मनमोहन सिंह
दरम्यान, राहुल गांधी यांना राजीनामा देण्याची गरज नाही, असं माजी पंतप्रधान मनमोहन सिंह म्हणाले. याशिवाय यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही राहुल गांधींची मनधरणी केली.
आम्ही सर्वजण राजीनामा देण्यास तयार – अशोक चव्हाण
राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याची गरज नाही. हे अपयश त्यांचं एकट्याचे नाही. आम्ही सामूहिक राजीनाम्याच्या तयारीत आहोत. पराभवासाठी राहुल गांधी एकटे जबाबदार नाहीत, राहुल गांधींनी राजीनामा देऊ नये, त्यांनी त्या त्या राज्यातील प्रमुखांचा राजीनामा घ्यावा आणि नवी जबाबदारी सोपवावी, असं अशोक चव्हाण म्हणाले.