नवी दिल्ली | 22 जुलै 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल रात्री अचानक दिल्लीत गेले. मध्यरात्री 1 वाजता ते दिल्लीत पोहोचले. त्यांच्यासोबत त्यांचं संपूर्ण कुटुंब होतं. त्यामुळे शिंदे दिल्लीत अचानक आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. आज दुपारी त्यांनी फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. संपूर्ण कुटुंबाला घेऊन ते पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेले होते. यावेळी त्यांनी पंतप्रधानांशी विविध विषयावर चर्चा केली. इर्शाळगड दुर्घटनेपासून ते धारावीच्या प्रकल्पापर्यंतच्या विषयावर ही चर्चा झाली. ही केवळ सदिच्छा भेट होती. या भेटीत राज्यातील विकास कामांवर चर्चा झाली. राजकारणावर कोणतीही चर्चा झाली नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर मीडियाशी संवाद साधताना स्पष्ट केलं.
राज्यात जे प्रकल्प सुरू आहेत त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली. पाऊस, शेतकरी, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि इर्शाळगड दुर्घटना यावर चर्चा झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धारावी प्रकल्पाची आवर्जुन आठवण काढली. हा आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. हा प्रकल्प झाल्यास लोकांचं जीवनमान उंचावले. हा प्रकल्प लवकर व्हावा अशी आशा त्यांनी व्यक्त केली, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
पुनर्वसनाचे प्रकल्प आणि एमएमआरडीएच्या प्रकल्पांना चालना देण्यावरही या भेटीत चर्चा झाली. आपल्या हक्काचं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं. प्रत्येकाचं स्वप्न असतं. चांगलं घर देणं सरकारचं काम असतं. त्यावरही चर्चा झाली. कोकणचं पाणी समुद्रात वाहून जातं. त्याचा उल्लेखही मी केला, असं सांगतानाच केंद्र सरकारकडून कोणत्याही विकास कामासाठी मदत दिली जाईल, असं आश्वासन मोदींनी दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
शिंदे कुटुंबातील चार पिढ्या पंतप्रधानांना आज भेटल्या. स्वत: एकनाथ शिंदे होते, त्यांचे वडील होते, मुलगा श्रीकांत शिंदे आणि श्रीकांत यांचा मुलगाही पंतप्रधानांच्या भेटीला गेले होते. त्यावरही शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आमचं सर्व कुटुंब होतं. माझे वडीलही होते. ही सदिच्छा भेट होती. मोदींनी आम्हाला बराच वेळ दिला. त्याबद्दल त्याचे आभार मानले.
पंतप्रधानांची भेट घेतल्याने वडिलांना समाधान वाटले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. पंतप्रधानांना भेटायची सर्वांची इच्छा असते. आज आमच्या चार पिढ्या एकत्र होत्या. याचा विशेष आनंद होता. मोदी माझ्या नातवाबरोबर ते खेळले, असं त्यांनी सांगितलं. आज आई सोबत नव्हती त्याची कमतरता होती. आई जिव्हाळ्याचा विषय आहे. पण ती नाही. तिचा आशीर्वाद आहेच, असं सांगताना शिंदे भावूक झाले होते.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इर्शाळगड दुर्घटनेतील लोकांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. अशा प्रसंगात सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र आलं पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं. त्याबाबत शिंदे यांना विचारण्यात आलं. त्यावर, अशा प्रकरणात लोकांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. त्यावर तोडगा काढला पाहिजे हे बरोबर आहे. कालच आम्ही मुख्य सचिव आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
इर्शाळगडमधील रहिवाशांचं पुनर्वसन केलं पाहिजे. त्यांना युद्धपातळीवर घरे देण्याच्या सूचना केल्या आहेत. दरडप्रवण क्षेत्रातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा निर्णय घेतला आहे. काहींचं स्थलांतर केलं आहे. पण काही लोक जायला तयार नाहीत, असं ते म्हणाले.