नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेही सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दिल्ली दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान मोदी (Pm Modi), अमित शाह, राजनाथ सिंह, जे.पी. नड्डा, अशा बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. या भेटीनंतर राज्याच्या प्रगतीत केंद्र शासनाच्या सहकार्याची महत्वाची भूमिका असून केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने महाराष्ट्राचा सर्वतोपरी विकास साधणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला. याविषयी माहिती देण्यासाठी महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यांच्या या भेटीत राज्यातल्या खातेवाटपाबाबतही चर्चा झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधानांसोबतच्या त्यांच्या भेटीचे फोटो सध्या चांगलेच चर्तेत आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री @mieknathshinde
आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis
यांनी आज पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.@CMOMaharashtra pic.twitter.com/osNhFcgryR— PMO India (@PMOIndia) July 9, 2022
खूप वेळ मोदींनी मला भेटीसाठी दिला. राज्याच्या विकासाच्या बाबतीत सर्व चर्चा झाली. सर्वसामान्यांचे हे सरकार आहे, राज्याचा सर्वांगीण विकास कसा करता येईल. शेतकरी कष्टकरी कामगार सर्व समाज घटकांना न्याय देण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या आणि या राज्याला विकासाकडे नेण्यासाठी जे जे काही लागेल जे सहकार्य लागेल, ते केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्याला दिले जाईल, एवढं मोठं आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिलं. आज पंतप्रधानांनी आपल्या कर्तुत्वाने या देशाचं नाव उज्वल केलेलेच आहे. या देशाचा गौरव साता समुद्रापलीकडे पोहोचवलेला आहे. आपल्या देशाचं नाव अभिमानाने घेतलं जाईल, एवढं मोठं काम त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे मलाही आज त्यांना भेटून आनंद झाला, समाधानही वाटलं. याचं कारण एका विचाराचे जे पक्ष आहेत, जे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचाराचे पक्ष आहेत ते एकत्र आले, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
तसेच बाळासाहेबांबद्दल त्यांनी भरभरून चर्चा केली. बाळासाहेबांबद्दलचे अनुभव ही त्यांनी सांगितले, बाळासाहेब आणि मोदींचे कसे संबंध होते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मात्र एवढ्या मोठ्या पदावर असताना देखील माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला एवढा वेळ देणं हे मी माझं भाग्य समजतो. मात्र त्यापेक्षाही त्यांनी राज्याच्या विकासावर खूप मोठी चर्चा केली. त्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानतो, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शुक्रवारी सायंकाळी दिल्लीत दाखल झाले. त्यांनी रात्री केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांची 6 ए, कृष्ण मेनन मार्ग या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. आज सकाळी त्यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची 17 अकबर रोड या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. दुपारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची 7 ,लोक कल्याण मार्ग या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली, अशी माहितीही अधिकृतरित्या त्यांच्याकडून देण्यात आली आहे.