मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दणका दिलाय. मेट्रो – 3 चं कारशेड आरेमध्येच होणार आहे. आरेतील मेट्रोच्या कारशेडवरील (Aarey Metro Car shade) स्थगिती मुख्यमंत्र्यांकडून मागे घेण्यात आलीय. त्यामुळे आता आरेमधील मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा झालाय. मेट्रो – 3 हा देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी निर्णय आहे. मात्र, महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार आल्यानंतर आरेतील मेट्रो कारशेड प्रकल्प रद्द करण्यात आला आणि कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला. आता शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने पुन्हा एकदा मेट्रो कारशेड प्रकल्प आरेमध्येच पुर्णत्वास नेण्याचा निर्णय घेतलाय.
सत्तेत येताच देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो कारशेड आरेमध्येच होणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. कारशेडच्या संदर्भात मुंबईकरांचं हित हेच आहे की, जिथं कारशेड 25 टक्के तयार झालं, तिथंच ते शंभर टक्के तयार व्हावं, असंही फडणवीस म्हणाले. त्यांनी सांगितलं की, मेट्रो तीनचे (Metro Three) भरपूर काम झाले आहे. पण कारशेडचं काम होत नाही तोवर ही मेट्रो सुरु होऊ शकत नाही. मागच्या सरकारच्या कारशेडसाठी जी जागा निवडली ती वादात आहे. ती जागा मिळाल्यानंतरही तिथे चार वर्षे कारशेड होऊ शकत नाही, असं फडणवीस म्हणाले होते.
त्याचबरोबर आमच्या सरकारच्या वेळी आरेतील जी जागा सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली होती. तिथे 25 टक्के काम पूर्ण झालं आहे आणि राहिलेलं 75 टक्के काम लवकर केलं जाऊ शकतं. त्यामुळे मुंबईकरांच्या हितासाठी लवकरात लवकर मेट्रो सुरु करायची असेल तर कारशेड आरेतच बनलं पाहिजे. त्यासाठी आमचा आरेतच कारशेड बनवण्याचा निर्णय असेल. उद्धव ठाकरेंचा पूर्ण आदर ठेवून इतकंच सांगतो की त्यांचा निर्णय चुकीचा आहे हे मी त्यांना वारंवार सांगितलं होतं. त्यांना विनंती केली होती की तुमचा ईगो तुम्ही बाजूला ठेवा आणि कारशेड आरेतच होऊ द्या, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं.
मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार झाल्यानंतर घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि फडणवीसांवर जोरदार टीका केली होती. मला आज एका गोष्टीचं वाईट वाटत आहे, माझ्यावर राग आहे तर तो माझ्यावर काढा. माझ्या पाठित वार करा, पण मुंबईच्या काळजात कट्यार खुपसू नका. आरेचा जो निर्णय त्यांनी बदलला त्याचं मला दुख: झालं आहे, असं ठाकरे म्हणाले होते.