गिरीश गायकवाड, टीव्ही9 मराठी, प्रतिनिधी, मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची युतीत आणि सरकारमध्ये एन्ट्री झाल्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. शिंदे गटाचे आमदार अस्वस्थ आहेत. ज्या अजित पवार आणि राष्ट्रवादीवर टीका करून शिवसेना सोडली. त्याच अजित पवारांचे आदेश आता मानावे लागणार असल्याने शिंदे गटाचे आमदार अस्वस्थ झाले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच राष्ट्रवादीशी युती केली नसती, असं शिंदे गटाचे आमदार वारंवार सांगत होते. आता त्यांचं हेच विधान त्यांच्या अंगलट आलं आहे. मतदारांना सांगायचं काय? असा सवाल या आमदारांना पडला आहे. तसेच अजितदादांच्या युतीतील एन्ट्रीमुळे उद्धव ठाकरे यांना मतदारांचीच नव्हे तर शिवसैनिकांचीही सहानुभूती मिळण्याची शक्यता आहे. याबाबत काही आमदारांनी नाराजीही व्यक्त केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आमदार आणि खासदारांची तातडीची बैठक बोलावली आहे.
आमदारांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यांनी आत आमदार आणि खासदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. आज संध्याकाळी 7 वाजता वर्षा बंगल्यावर ही बैठक होणार आहे. या बैठकीत सध्याच्या राजकिय परिस्थितीवर सर्व आमदार आणि खासदारांशी चर्चा होणार आहे. तसेच अजित पवार यांना युतीत घेतल्याने होणाऱ्या परिणामावरही चर्चा होणार आहे. त्याशिवाय आजच्या बैठकीत महत्त्वाची घोषणा केली जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
अजितदादांच्या शपथविधीनंतर शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी ही बैठक बोलावली आहे. तसेच अजितदादांना युतीत घेतल्याने मतदारसंघात होणाऱ्या अडचणीचा पाढाच हे आमदार मुख्यमंत्र्यांसमोर वाचणार असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय अजित पवार यांना अर्थखाते देऊ नये, त्यांना अर्थखाते दिल्यास मतदारांना काय उत्तर देणार? शिवसैनिकांमध्ये आपलीच प्रतिमा मलिन होईल. उद्धव ठाकरे यांच्यावरील सर्व आरोप आपोआप पुसले जातील. त्यामुळे अजित पवार यांना अर्थखाते देऊ नये, असं या आमदारांकडून शिंदे यांना सांगितलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच शिंदे या आमदारांची कशी समजूत काढतात याकडेही सर्वाचं लक्ष लागलं आहे.
येत्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यात 18 आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यात शिंदे गटाचे आमदार किती असतील? यावरही आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे. शिंदे गटाला किती मंत्रीपद आणि कोणती मंत्रिपदं मिळणार आहेत. तसेच या विस्तारात कुणाकुणाला संधी मिळणार आहे, यावरही बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
अजित पवार सत्तेत आल्याने शिंदे गटाला सत्तेतील वाटा कमी मिळणार असल्यानेही शिंदे गटात नाराजी आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा झाल्यानंतर सत्तेचा वाटा आणि फॉर्म्युला ठरला. त्यानंतर शिवसेनेत बंड करून वेगळी चूल मांडली गेली. त्यामुळे जे ठरलं ते आता मिळालं पाहिजे. अजित पवार यांना सत्तेचा वाठा द्यायचाच असेल तर तो भाजपच्या कोट्यातील दिला पाहिजे. आपल्या कोट्यातून देऊ नये, असा एक मतप्रवाह शिंदे गटात आहे. त्यावरही या बैठकीत चर्चा होऊ शकते, असं जाणकारांचं म्हणणं आहे.