औरंगाबाद : राज्यात सत्तांतर होऊन एक महिना उलटला तरी अजूनही मंत्रिमंडळाचा (Cabinet Expansion) पत्ता नाहीये. त्यावरून विरोधक सरकारला रोज घेण्याचा प्रयत्न करत आहेत. एक दुजे के लिए, हम तुम एक कमरे में बंद हो, असेच हे सरकार आहे, अशी टीका या सरकारवर रोज होत आहे. तर विरोधी पक्षनेते अजित पवार हेही तात्काळ मंत्रिमंडळ विस्ताराची मागणी करत आहेत. अशातच काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) हे तातडीने दिल्लीला रवाना होणार असल्याची बातमी आली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या दिल्ली वारीत तरी मंत्रिमंडळ विस्तारला मुहूर्त मिळेल, अशी आशा राज्यातील जनतेला लागली आहे. त्यातच आता शिंदे गटातील आमदार संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) यांनी एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत एक मोठा विधान केलं आहे. उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुड न्यूज देऊ शकतात, असे सूचक विधान संदिपान भुमरे यांनी केलंय. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा उद्याच होणार का? असा सवाल प्रत्येकाच्या मनात आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्मुला ही सध्या चर्चेत आला आहे. यावेळेस मंत्रिमंडळ विस्तारात फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्मुला ठरल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे. यात शिंदे गटाला 17 ते 18 मंत्रिपदा मिळण्याची शक्यता आहे तर भाजपला यात 25 ते 26 मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे, तर शिंदे गटासोबत आणि भाजप सोबत असणाऱ्या अपक्ष आमदारांना ज्याच्या त्याच्या पक्षाच्या कोट्यातून मंत्रीपद देणार असल्याचीही चर्चा सुरू आहे. मात्र या सगळ्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखेची अजूनही प्रतीक्षाच आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिमंडळ विस्तारा बाबत सवाल विचारला असता आमच्यात सर्व चर्चा झालेली आहे. आमचं सर्व ठरलेलं आहे. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल. असे उत्तर मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून देण्यात येत आहेत. तर तुमच्याकडे पूर्ण बहुमत असून मंत्रिमंडळ विस्तारला का घाबरताय असा सवाल विरोधकांकडून करण्यात येतोय.
तसेच एक ऑगस्टला शिंदे सरकारबाबत सुप्रीम कोर्टात सर्वात मोठी सुनावणी पार पडणार आहे. ही सुनावणी लक्षात ठेवून मंत्रिमंडळ विस्ताराचं प्लॅनिंग आखले जातंय. अशाही चर्चा सुरू आहेत. 16 आमदारांच्या अपात्रतेसाठी शिवसेनेकडून सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली आहे. त्यावरतीच एक ऑगस्टला सुनावणी पार पडणार आहे. ती सुनावणी या सरकारचा भवितव्य आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा ठरवणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे ही संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.