औरंगाबाद : महाराष्ट्रात (Maharashtra) येणारी गुंतवणूक थांबू देणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी म्हटलं आहे. ते औरंगाबादेत (Aurangabad) बोलत होते. वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टरचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर आता उद्योगांसाठीच्या जमिनीबाबत पुनर्वलोकन केलं जात असल्याचा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. राज्यातील एमआयडीसीच्या भूखंड वाटपाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे उद्योजक वर्गात प्रचंड नाराजीचा सूर उमटताना पाहायला मिळतोय. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलं.
भूखंड वाटप स्थगितीमुळे उद्योगांना फटका बसल्याचा आरोप होतो आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी सविस्तर भूमिका मांडली. नाराज उद्योजक वर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या वक्तव्यातून केलाय.
उद्योगांची गुंतवणूक थांबू नये, यासाठी उद्योगमंत्री आणि प्रशासकीय यंत्रणांना आदेश देण्यात आल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. जे भूखंड दिलेले आहेत, त्याची माहिती घेण्याचं काम सुरु आहे, त्याला स्थगिती दिलेली नाही, असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं. गुंतवणूक कुठेही थांबता कामा नये, यासाठी तातडीने काम करण्यासाठीच्या सूचना दिल्याचंही त्यांनी नमूद केलं.
जास्तीत जास्त उद्योग महाराष्ट्रात यावेत, यासाठी वन विंडो क्लिअरन्सच्या धर्तीवर सरकार काम करेल, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. त्यासाठी तातडीने सोयीसुविधा, परवानग्या आणि सबसिडीच्या माध्यमातून उद्योगांना मदत करण्यासाठी सरकार सहकार्य करेल, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी आश्वस्त केलं.
दरम्यान, उद्योजक वर्गात नाराजी असल्याचं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलंय. एमआयडीसी भूखंड वाटप स्थगितीच्या निर्णयावरुन आता राजकारण तापलंय. त्यामुळे थेट दिल्लीत तक्रार करणार असल्याचंही अंबादास दानवे यांनी म्हटलं.
औरंगाबादेत मराठवाडा मुक्ती संग्रामावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्याचा दुष्काळ, वेगवेगळ्या योजना यांवरही भाष्य केलं. तसंच मराठवाड्यासाठी वेगवेगळ्या विकासकामांची घोषणा केली. दरम्यान, मराठवाड्यासाठीची विकासकामं वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी वॉररुमच्या माध्यमातून सातत्याने आढावा घेत राहणार आहोत, असंही शिंदेंनी स्पष्ट केलं.
औरंगाबादमधील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर एकनाथ शिंदे हे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या राजकीय प्रश्नांनाही उत्तरं दिली. गेल्या दोन अडीच वर्षात काय झालं, हे मी आता बोलू इच्छित नाही, असं म्हणत शिंदेंनी महाविकास आघाडीला टोला लगावला. तसंच आताचं सरकार हे भाजप-शिवसेना युतीचं सरकार असून हे लोकाहिताचे निर्णय घेईल, असंही ते म्हणाले.