मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची आज नवी दिल्लीत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांच्यासोबत शिंदे-फडणवीस यांची ही बैठक असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्रात शिवसेनेतून बाहेर पडलेला एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांच्या महायुतीतून सरकार स्थापन झालं आहे. 30 जून रोजीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेतली आहे. मात्र राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झालेला नाही. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकांसाठी तसेच सुप्रीम कोर्टातील आमदारांच्या अपात्रतेविषयी याचिका प्रलंबित असल्याने मंत्रिमंडळ विस्तार थांबल्याची चर्चा होती. मात्र आता भाजप आणि एकनाथ शिंदे गटात खातेवाटपाच्या लीस्टवर अखेरचा हात फिरवला जाणार असल्याची चर्चा आहे. शिवसेनेतून बंडखोरी करत बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे गटातील आमदारांना जास्तीत जास्त मंत्रिपदं मिळावीत, यासाठी मुख्यमत्री आग्रही असल्याची चर्चा आहे. यावर भाजपाची सहमती आहे की नाही, हे आगामी काळात दिसून येईल. तूर्तास तरी ही लीस्ट फायनल करण्यासाठी आज दिल्लीत महत्त्वाची बैठक असल्याचे कळतेय.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेऊन 22 दिवस उलटले तरीही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. हे दोघंच निर्णय घेतात, दोघांचंच मंत्रिमंडळ आहे, अशा आशयाच्या प्रतिक्रियाही उमटत आहेत. मात्र आता एकनाथ शिंदे सरकारचं मंत्रिमंडळ लवकरात लवकर घोषित होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच पहिल्या टप्प्यात 25 मंत्र्यांना शपथ दिली जाईल, असंही सांगण्यात येत आहे.
दरम्यान, मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सन्मानार्थ आज दिल्लीत स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासाठी देशातील सर्व राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज संध्याकाळी चार वाजता दिल्लीकडे रवाना होतील. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या स्नेहभोजनाचा समारंभ सायंकाळी 7 ते 10 या वेळेत होणार आहे. त्यानंतर शिंदे फडणवीस भाजपच्या पक्ष श्रेष्ठींची भेट घेतील आणि त्यात मंत्रिमंडळाच्या लीस्टवर फायनल हात फिरवला जाईल, अशी शक्यता आहे.