ठाणे : विधिमंडळाच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील भाजप आणि शिंदे गटाच्या सरकारने आज विश्वासदर्शक ठराव जिंकला. 164 विरुद्ध 99 इतक्या मोठ्या फरकानं शिंदे सरकारनं हा विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी हुतात्मा स्मारक, चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar), शिवतीर्थावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांना वंदन केलं. आनंदाश्रमात आनंद दिघे यांना अभिवादन केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाणेकरांना संबोधित केलं. त्यावेळी मी कितीही मोठा झालो तरी माझ्यातला शिवसैनिक कायम जिवंत राहील असा दावा केला. तसंच एका हिंदी चित्रपटातील डायलॉगही शिंदे यांनी यावेळी बोलून दाखवला.
मुंबईतून ठाण्यात प्रवेश केल्यानंतर भर पावसात हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते, शिवसैनिक भिजत स्वागतासाठी उभे होते. महिला भगिनी किती मोठ्या संख्येनं उपस्थित आहे. तुम्हाला सांगतो हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व, त्यांचे हिंदुत्वाचे विचार, त्यांची भूमिका आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण या दोन कारणांमुळे आम्ही बंड नाही, तर अन्यायाविरुद्ध उठाव केलाय. बाळासाहेबही सांगायचे, अन्याया होईल तेव्हा तो सहन करु नका, अन्यायाविरुद्ध पेटून उठा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण आहे. गेली 15 दिवस मी ठाण्याच्या बाहेर होतो. आज मी ठाण्यात आलोय. जसं तुम्हाला मला भेटायचं होतं, तसंच मलाही माझ्या शिवसैनिकांना, माझ्या कार्यकर्त्यांना भेटायची ओढ लागली होती.
वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या टेंभीनाका येथील आनंद आश्रम येथे उपस्थित राहून त्यांच्या पावन स्मृतींस आदरपूर्वक अभिवादन केले.
याप्रसंगी सोबत शिवसेना तसेच सहयोगी पक्षांचे सर्व आमदार उपस्थित होते. pic.twitter.com/c9O0lhyv0f
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 4, 2022
आज मुंबईत सभागृहात सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. एकीकडे 99 होते तर दुसरीकडे 164 होते. त्यामुळे बहुमताने आपण सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव जिंकलाय, आपला विजय झालाय. बाळासाहेब, आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादानं आणि तुमच्या विश्वासानं हा एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री झालाय. मलाही वाटलं नव्हतं, मला अजून वाटतच नाही मी मुख्यमंत्री म्हणून. मी तुमच्यातलाच कार्यकर्ता होतो आणि पुढेही तुमच्यातीलच कार्यकर्ता राहणार आहे. माझ्यातला शिवसैनिक मी कितीही मोठा झालो तरी कायम जिवंत राहणार आहे. म्हणून तुमच्या या ठाण्यातील एकनाथ शिंदेची दखल फक्त राज्यानं नाही तर संपूर्ण देशात, किंबहुना 33 देशांनी घेतलीय. त्यांना उत्सुकता लागलीय की हा एकनाथ शिंदे कोण? असा दावाही शिंदे यांनी केलाय.
एकीकडे सत्ता होती, यंत्रणा होती, मोठे नेते होते, दुसरीकडे सर्वसामान्य, बाळासाहेबांचा शिवसैनिक, दिघे साहेबांचा शिवसैनिक होता. सोबत 50 आमदार होते. एका वैचारिक भूमिकेतून या 50 लोकांनी तुमच्या एकनाथ शिंदेवर विश्वास दाखवला. एकही माणूस मागे हटला नाही. हे माझं नाही त्यांचं मोठेपण आहे. त्याचं कारण त्यांना जेव्हा खात्री पटते की एकनाथ शिंदे दिलेल्या शब्द पाळतो, दिलेल्या शब्दाला जागतो. त्याचमुळे या 50 लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय. कारण मी एकदा कमिटमेंट केली, एकदा शब्द दिला की मी माझं स्वत:चंही ऐकत नाही. म्हणूनच राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवण्याची संधी या तुमच्या छोट्या कार्यकर्त्याला मिळालीय. या संधीचं सोनं आपल्याला करायचं आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.
पंतप्रधान मोदींनी मला सांगितलं या राज्याचा विकास करा, हे राज्य पुढे घेऊन जा. मी, केंद्र सरकार तुमच्यासोबत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहदेखील म्हणाले की हिंदुत्वाचा, बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन तुम्ही पुढे आलात. आम्ही दिल्ली, केंद्र सरकार तुमच्या पाठीशी आहे, असा शब्द त्यांनी दिलाय. आपले देवेंद्र फडणवीस, तुम्हाला वाटत असेल अरे ते मुख्यमंत्री होणार होते, उपमुख्यमंत्री झाले. पण त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि आपल्या पक्षाच्या आदेशाचं पालन केलं. आम्ही दोघं मिळून या राज्याचा सर्वांगिण विकास करु. आपण शिवसेना-भाजप युती म्हणून निवडणूक लढवली. पण आपण दुसरा मार्ग पत्करला, त्या दुसऱ्या मार्गात आपल्याला हिंदुत्वाचं नावही घेता येत नव्हतं. बाळासाहेबांचे विचारही पुढे आणता येत नव्हते. बाळासाहेबांनी कधीही काँग्रेस, राष्ट्रवादीला जवळ केलं नाही. त्यांनी हिंदुत्वासाठी कधीही तडजोड केली नाही. म्हणूनच हे मोठं धाडस आपण केलं, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.