मुंबईः एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज आमदार आणि खासदारांसोबत गुवाहटीत (Guwahati) कामाख्या देवीच्या (Kamakhya Devi) दर्शनासाठी निघाले आहेत. यावरून विरोधकांकडून टीकेची झोड उठली आहे. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे गटाला टोला मारला. कामाख्या देवीला कुणाचा बळी देणार आहे, असा सवाल केला. या प्रश्नाला शालेय शिक्षण मंत्री आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलंय.
दीपर केसरकर म्हणाले, ‘ महाराष्ट्राच्या विकासाच्या आड येणाऱ्या विचारांचा बळी देणार आहोत. महाराष्ट्राचा खूप विकास व्हावा, अशी आम्ही प्रार्थना करणार आहोत. अतिवृष्टी, वेगवेगळे रोग होतात, या अरिष्टांचा बळी कामाख्या देवीने घ्यावा आणि महाराष्ट्राच्या जनतेला सुखी करावं, एवढीच प्रार्थना करण्यासाठी आम्ही कामाख्या देवीकडे जातोय. एक चांगलं सरकार महाराष्ट्रात आलंय, त्याबद्दलचं नवस फेडायला आम्ही जातोय, असं दीपक केसरकर यांनी सांगितलं.
या दौऱ्यात अनेक आमदार आणि खासदार गैरहजर आहेत. यावरूनही राजकीय चर्चा सुरु आहे. पण केसरकर यांनी यावर प्रत्युत्तर दिलंय. प्रक्येकजण आपल्या सवडीने येत असतो. प्रत्येकाला ती वेळ सोयीची असेल असे नाही…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला तेव्हाच निमंत्रण दिलं होतं. त्यामुळे आम्ही जातोय. कामाख्या देवीचं दर्शन घ्यायला तिथे जातोय. आमची श्रद्धा आहे. भक्तीभावाने सगळे जातोयत. या राज्यातल्या बळीराजाला चांगले दिवस येऊ द्या, जनता सुखी व्हावी, हाच अजेंडा आहे, याच प्रामाणिक भावनेतून आम्ही जातोय..
कामाख्या देवीने आमची, जनतेच्या मनातील इच्छा पूर्ण केली. त्यामुळे आणखी काही मागण्याची आवश्यकता नाही, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर आमदार-खासदार यांचा ताफा आज विशेष विमानाने गुवाहटीच्या दिशेने निघाले. दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास ते गुवाहटीत पोहचतील. तेथे हॉटेल रेडिसन ब्लू येथे त्यांचा मुक्काम असेल. दुपारनंतर ते कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जातील. तिथे विशेष पूजेचं आयोजन करण्यात आलं आहे.