नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्लीत दाखल झाले आहेत. शिंदे आणि फडणवीसांच्या दिल्लीवारीत गेल्या दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर (Cabinet Expansion) आज शिक्कामोर्तब होणार असल्याचं सांगितलं जात आहेत शिंदे आणि फडणवीस आज भाजप श्रेष्ठींशी चर्चा करतील. त्यात खातेवाटप आणि सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court) आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर चर्चा होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा सत्कार समारंभ आणि स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला शिंदे आणि फडणवीस हजेरी लावणार असल्याची माहिती मिळतेय.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर 30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून राज्यात खातेवाटप कधी होणार? असा प्रश्न सर्वच स्तरातून विचारला जातोय. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तर सध्या राज्याचे दोनच मालक असल्याची टीकाही केली होती. तर राज्यातील सध्याची स्थिती हाताळण्यास शिंदे आणि फडणवीस सक्षम असल्याचा दावा भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांकडून केला जातोय. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारासाठी लागणारा विलंब सरकारची अस्थिरता दर्शवत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर विस्तार करणं शिंदे आणि फडणवीसांची गरज बनली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता जोरदार राजकीय हालचाली पाहायला मिळत आहे.
राष्टपती निवडणुकीनंतर राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार होणार असंही सांगितलं जात होतं. 19 आणि 20 जुलै अशी तारीखही देण्यात येत होती. मात्र, अद्याप विस्तार झालेला नाही. अशावेळी आता मंत्रिमंडळ विस्ताराची नवी तारीखही सांगितली जात आहे. 24 जुलै रोजी मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
खातेवाटपात कुणाचं पारडं जड राहणार अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र, शिंदे आणि फडणवीस यांच्यात खातेवाटपाचं सूत्र ठरलं असल्याचं सांगितलं जात आहे. दर चार आमदारांमागे एक मंत्रिपद निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. त्यानुसार शिंदे गटाला 14 ते 15 तर भाजपच्या वाट्याला 26 ते 27 मंत्रिपद येतील.
महाविकास आघाडी सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि एमएसआरडीसी खाते होते. आताही ही दोन्ही खाती शिंदे गटाकडेच ठेवली जाण्याची दाट शक्यता आहे. तर भाजपकडे गृह, अर्थ, महसूल अशी महत्वाची खाती घेतली जातील अशी शक्यता व्यक्त केली जातेय.