नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी राजधानी दिल्लीत नीती आयोगाची (Niti Aayog) बैठक पार पडली. या बैठकीला देशातील जवळपास सर्वच राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. मात्र, या बैठकीला तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार मात्र अनुपस्थित राहिले. या बैठकीचा एक फोटो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला विषय ठरला आहे. नीती आयोगाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींसह अनेक केंद्रीय मंत्री आणि उपस्थित सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा एक फोटो अनेकांकडून ट्वीट करण्यात आलाय. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शेवटच्या रांगेत उभे असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यावरुन दिल्लीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अवमान ढाल्याचा सूर आता विरोधकांकडून आळवला जातोय. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिलीय.
औरंगजेबाच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी गेले, दुसऱ्या रांगेत उभं केलं म्हणून त्यांनी ती सभा सोडली. आता आपल्याला तिसऱ्या रांगेत जाऊन उभं राहावं लागत आहे. परिस्थिती किती बदलली आहे. महाराष्ट्रात किती झुकलाय हे पाहायला मिळत आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केलीय. त्याचवेळी तिथला प्रोटोकॉल अल्फाबेटिकली असतो त्यामुळे ते मागे उभे राहिले असती, असंही पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
फोटो पाहिल्यानंतर एक लक्षात येतं की एकनाथ शिंदे हे फोटोसाठी त्या ठिकाणी उभे होते. पण या आधीचा एक प्रसंग मी आपल्याला सांगतो की, राष्ट्रपतींचा शपथग्रहण सोहळा ज्या दिवशी झाला त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूला पहिल्या रांगेत होते, हे कुणाला दिसलं नाही हे आपलं दुर्दैवं आहे. कुठेतरी राजकारणासाठी राजकारण करुन विरोध करण्यात काही अर्थ नाही, अशा शब्दात उदय सामंत यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलंय.
रोहित पवार यांनी ट्वीट करत नाराजी व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक मराठी मनाला यामुळं नक्कीच दुःख झालंय. यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा करूयात!, असं रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय.
एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक #मराठी मनाला यामुळं नक्कीच दुःख झालंय. यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा करूयात! pic.twitter.com/3xYPid3U3N
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 7, 2022