मुंबई : मुंबईत सर्वसामान्यांसाठी मुख्यमंत्र्यांचं हक्काचं ठिकाण म्हणजे मंत्रालय आणि वर्षा निवासस्थान. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाळीनंतर राज्याच्या राजकारणात भूकंप झाला आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ‘वर्षा’ निवासस्थान सोडलं. उद्धव ठाकरे वर्षा निवासस्थान सोडत असताना राज्यात एक भावनिक लाट तयार झाली होती. वर्षा सोडून उद्धव ठाकरे मातोश्रीवर गेले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार पायउतार झालं. पुढे अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. राज्यातील शिंदे सरकारला महिला उलटला. मात्र, अद्याप शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तारही झाला नाही आणि शिंदे वर्षा निवासस्थानी (Varsha Bungalow) राहण्यासाठीही गेले नाहीत. मात्र, आता अखेर एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी वर्षा निवासस्थानी लागली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे वर्षा निवासस्थानी राहण्यासाठी जातील अशी शक्यता निर्माण झाली आहे.
एकनाथ शिंदे 2014 पासून मलबार येथील नंदनवन या शासकीय निवासस्थानातून आपला कारभार चालवत आले आहेत. पण मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे वर्षा या निवासस्थानी राहायला जाणार का? असा सवाल विचारला जातोय. कारण अखेर एक महिन्यानंतर वर्षा निवासस्थानाला एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी लावली गेलीय. तसेच वर्षा बंगल्याची रंगरंगोटी देखील पुर्ण झाल्याची माहिती तिथल्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे.
राज्यात सत्तापालटानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने दौऱ्यावर आहेत. त्यामुळे शिंदे यांना थकवा जाणवू लागला आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिल्याने शिंदे यांनी त्यांचे सर्व प्रशासकीय आणि राजकीय कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस शिंदे कोणतेही कार्यक्रम घेणार नसल्याचं सांगितलं जात आहे. तसेच या काळात ते सामान्य नागरिकांना भेटणार नसल्याचंही बोललं जातंय. मात्र, मंत्रालय किंवा त्यांच्या निवासस्थानातून ते कामकाज पाहणार असल्याचं कळतंय. शिंदे यांना थकवा जाणवत असला तरी चिंता करण्याचं कारण नसल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं आहे.