नवी दिल्ली | 22 जुलै 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल रात्री अचानक दिल्लीत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत एकटेच आले आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार नाहीत. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री दिल्लीत येण्याच्या कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, शिंदे दिल्लीत तेही रात्रीच्यावेळी अचानक आल्याने मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री दीड वाजेच्या सुमारास दिल्लीत आले. आपल्या कुटुंबासह मुख्यमंत्री दिल्लीत आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री दिल्लीत दोन दिवस राहण्याचे संकेत मिळत आहेत. आज दिवसभरात ते पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांची भेट घेणार आहेत. या भेटीत शिंदे काय चर्चा करतात आणि काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिंदे आज दिल्लीत भाजपच्या इतर नेत्यांचीही भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.
मध्यरात्री शिंदे दिल्लीत आले. दिल्लीत ते तडक त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी गेले. सहकुटुंब ते दिल्लीत आले आहेत. आज दिवसभर शिंदे हे महाराष्ट्र सदनात असतील. या दरम्यान ते दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीही घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान, या भेटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांना वगळून ही चर्चा होऊच शकत नसल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. शाह यांच्या भेटीत विस्ताराचा विषय निघू शकतो, मात्र, शिंदे यांच्या भेटीचं मुख्य कारण वेगळच असल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे यांना बदलून राज्याची सूत्रे अजित पवार यांच्या हाती दिली जाण्याची चर्चा आहे. त्यामुळे शिंदे लॉबिंग करण्यासाठी आले की काय? अशी चर्चा रंगली आहे.
अजित पवार हे राज्यातील सत्तेत सहभागी झाले आहेत. त्याच्या गटाला अर्थ खात्यासह इतर महत्त्वाची खातीही देण्यात आली आहे. शिंदे गटाच्या वाट्याला आलेली खातीही अजित पवार यांच्या गटाला देण्यात आल्याने शिंदे गटात नाराजी आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढली आहे. त्याबाबतही शिंदे या भेटीत चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गेल्या तीन दिवसातील ही दुसरी दिल्लीवारी आहे. तर महिनाभरातील ही पाचवी दिल्लीवारी आहे. शिंदे तीन दिवसांपूर्वीच दिल्लीत एनडीएच्या बैठकीसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली होती. पुन्हा एकदा शिंदे अचानक रात्री दिल्ती आल्याने चर्चांना उधाण आले आहे.