मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांची दैनिक सामनात प्रदीर्घ मुलाखत छापून आली आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच शिंदे गटाच्या आमदारांची तुलना पालापाचोळ्याशी केली आहे. गेला तो पालापाचोळा आहे. तो उडून गेल्याशिवाय राहणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. उद्धव ठाकरे यांच्या या विधानाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्यापासून भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांनी खरपूस समाचार घेतला आहे. केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी तर उद्धव ठाकरेंची ही मुलाखत बोगस असल्याचा दावा केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनीही उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शिंदे यांनी अत्यंत मोजक्याच शब्दात उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. लक्षात ठेवा, याच पालापाचोळ्यांनी इतिहास घडवलाय, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
स्मिता ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना आजच्या उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीतील पालापाचोळा या विधानाबाबत विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांना आणखी काही बोलायचं ते बोलून होऊ द्या. मग एकत्रितपणे उत्तर देऊ. त्यांना वाटतं पालापाचोळा आहे. तर या पालापाचोळ्यानेच इतिहास घडवला आहे. जनतेला माहीत आहे. इतिहास घडवणारे कोण असतात हे जनतेने पाहिले आहे. आमची लढाई सत्तेसाठी नाही. बाळासाहेबांच्या विचारांसाठी होती. बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका घेऊन आम्ही हा निर्णय घेतला. त्यामुळे कुणाला पालापाचोळा, पानगळ काय म्हणायचे ते म्हणू द्या. तो त्यांचा विचार आहे. परंतु, पुन्हा एकदा सांगतो याच पालापाचोळयाने इतिहास घडवलेला आहे, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांची मुलाखत ही फिक्स मॅच सारखी होती. फिक्स मॅच मी बघत नाही. मी लाईव्ह मॅच बघत असतो. जेव्हा पुढे काही होईल तेव्हा मी त्यावर प्रतिक्रिया देईन, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला होता.
शिवसेनेत वादळ आलं आहे हे खरे आहे. पण या वादळात सडकी पानं झडलीच पाहिजे. आता वादळ आल्यानंतर पाला पाचोळा उडतो. आताही तो उडत आहेच. हा पालापाचोळा एकदा जमीनवर आला की खरं दृश्य लोकांसमोर नक्कीच येणार आहे. जे गळणं गरजेचं होतं, ते निघून जात आहेत. वर्षामध्ये दोन झाडं आपल्या घराला लागूनच आहेत. एक गुलमोहर आणि बदामाचं. या झाडांची पानगळ पाहिलीय. पानं पूर्ण गळून जातात. आपल्याला वाटतं, या झाडाला काय झालंय.. आठ दिवसात बदामाचं झाड, गुलमोहराचं झाडही डवरून येतं. तसंच शिवसेनेचंही होणार, असं उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत म्हटलं होतं.
मी शांत का आहे. तर मला शिवसेनेची चिंता नाहीये. मराठी माणसं आणि हिंदुत्वाची चिंता आहे. आपल्या घरातच हिंदुद्वेष्टे आहेत. मराठी माणसाची एकजूट तुटावी, असा प्रयत्न केला जातोय. तो आपल्याच कळाकरंट्यांच्या हातनं केला जातोय. म्हणून मी म्हणतोय हा पालापाचोळा उडतोय, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.