मुंबईः मागील सहा महिन्यातच महाराष्ट्राच्या (Maharashtra) आरोग्य यंत्रणेत मोठे बदल घडत आहेत. कुटुंबातील माता भगिनी, लहान मुले असतील किंवा वृद्ध यांच्यासाठी आरोग्य सुविधा तत्पर मिळवण्यासाठी हे शासन (Maharashtra Govt) प्रयत्नशील आहे. स्त्री ही कुटुंबातील महत्त्वाची व्यक्ती असते. मात्र स्वतःच्या आरोग्य तपासणीकरिता ती अनेकदा दुर्लक्ष करते. राज्यातील अशा तब्बल ४ कोटी ३९ लाख महिलांची आरोग्य तपासणी आम्ही नुकतीच केली, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली. तसेच प्रत्येक तालुक्यात बाळासाहेबांचा आपला दवाखाना उघडून राज्यातील जनतेला मोफत रुग्ण तपासणी आणि उपचारांची सोय करून देणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय. टीव्ही ९ मराठीच्या वतीने आयोजित महाराष्ट्राचा महासंकल्प, या कार्यक्रमात ते बोलत होते.
महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेवर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘ कुटुंबातल्या स्त्रियांना वेळ मिळत नाही. व्याप असतो. म्हणून आम्ही माता सुरक्षित कुटुंब सुरक्षित ही योजना सुरु केली. या अंतर्गत 4 कोटी 39 लाख महिलांची तपासणी करण्यात आली. कुणाला हायपर टेंशन तर कुणाला बीपी, डायबेटिज असे आजर निघाले. सुरुवातीला निदान झालं तर इलाज करता येतो. महिला भगिनी कुटुंबातील आधार असते. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर फोकस केलाय.
स्त्रियांप्रमाणेच 0 ते 18 वयोगटातील मुलांची तपासणी होणार आहे.3 कोटी मुलांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे, असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.
मुंबईत बाळासाहेबांचा आपला दवाखानाच्या अनेक शाखा सुरु झाल्या आहेत. माझ्या वाढदिवसाला अनेकजण शुभेच्छा द्यायला आले. म्हणाले, राज्यातही आपला दवाखाना सुरु करा. त्यावेळीच मी संकल्प केला आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घोषणा केली. प्रत्येक तालुक्यात बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाची सुरुवात होणार आहे. लोकांना त्याचा फायदा होईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रदेखील आम्ही मोठी करत आहोत. आरोग्य केंद्र अपग्रेड करत आहोत. प्रत्येक प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज करतोयत. ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना यामुळे जास्त सुविधा मिळतील, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं.
शाळांमध्येही स्वच्छता राखली पाहिजे. तिथे ज्ञानदानाचं काम शिक्षक करतात. विद्यार्थी शिक्षण ग्रहण करतात. त्यांच्यावर चांगले संस्कार घडले पाहिजेत. त्यामुळे शाळांमधील पायाभूत सुविधाही वाढवल्या जात आहेत. हे करत असताना उद्योगही इकडे आले पाहिजेत, त्यासाठी आमचे प्रयत्न आहेत, असं शिंदे यांनी सांगितलं.