Eknath Shinde : ठाणे, नागपूरपाठोपाठ नवी मुंबईतही ठाकरेंना धक्का, 30 ते 35 नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर, कल्याण डोंबिवलीतही खिंडार पडणार?

| Updated on: Jul 07, 2022 | 3:57 PM

ही गळती रोखण्याचं आव्हान हे उद्धव ठाकरे आणि इतर नेत्यांसमोर असणार आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची ताकद दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

Eknath Shinde : ठाणे, नागपूरपाठोपाठ नवी मुंबईतही ठाकरेंना धक्का, 30 ते 35 नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर, कल्याण डोंबिवलीतही खिंडार पडणार?
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं टेन्शन काही केल्या कमी होताना दिसत नाही. आधी आमदारांनी बंड करत सरकार पाडलं. आता नगरसेवक आणि अनेक पदाधिकारी हे शिंदे गटाची (Cm Eknath Shinde) वाट धरताना पाहायला मिळत आहेत. आधी नागपुरातील पदाधिकारी शिंदे गटात जाणार असल्याच्या बातम्या आल्या. मग ठाण्यातल्या नगरसेवकांनी (Shivsena Corporators) ठाकरेंना धक्का देत शिंदे गटाची वाट धरली. त्यापाठोपाठ आता नवी मुंबईतील तब्बल 30 ते 35 नगरसेवक हे शिंदे गटाच्या वाटेवर आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा मोठा हादरा असणार आहे. याचा फटका ठाकरेंना महापालिका निवडणुकीत नक्कीच बसणार आहे. तर आणखी काही बडे नेतेही ठाकरेंंची साथ सोडताना दिसून येत आहेत. त्यामुळे ही गळती रोखण्याचं आव्हान हे उद्धव ठाकरे आणि इतर नेत्यांसमोर असणार आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची ताकद दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

कोणते प्रमुख नेते शिंदे गटात?

कारण नवी मुंबईतील गटनेते विजय नहाटा व शिवसेनेचे मोठे नेते विजय चौगुले यांनी शिंदे गटाला पहिल्यापासूनच समर्थन दिल आहे. शिवसेना नेते विजय चौगुले यांना मानणारा वर्ग नवी मुंबई मोठ्या प्रमाणात आहे व विजय चौगुले 2014 मध्ये शिवसेनेच्या तिकटावरून विधानसभा लढवली होती. ठेव्हा त्यांचा पराभव हा तेव्हा राष्ट्रवादीत असलेले संदीप नाईक यांनी केला होता. मात्र 2019 ला शिवसेना-भाजप युती असल्यामुळे ऐरोली विधानसभेत भाजप विद्यमान आमदार गणेश नाईक हे निवडून आले होते.

माजी नगरसेवकही जाणार?

नवी मुंबईतील विविध कार्यक्रममध्ये देखील विजय चौगुले हे सध्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलवत होते. त्यामुळे ते शिंदे गटात गेल्याने त्यांच्यासोबत असणारे माजी 20 नगरसेवक देखील शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. बेलापूर विधानसभेमधून शिवसेनेच्या तिकटावर विजय नाहाटा लढले होते. त्यामुळे ते देखील एकनाथ शिंदे यांना मानणारे आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील शिवसैनिक हे शिंदे गटाच्या वाटेवरती असल्याच्या चर्चा आहेत.

कल्याण-डोंबिवलीत धक्का बसणार?

ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुबंई या परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा दबदबा आहे. त्यामुळे या परिसरात ठाकरेंची साथ अनेक नेते सोडून शिंदे गटात दाखल होत आहेत. हे फक्त ठाण्यावर आणि नवी मुंबईवर थांबण्यासारखं चित्र सध्या तरी नाही. कारण कल्याण-डोंबिवलीतही अशाच फुटीचा सामना हा ठाकरेंना करावा लागू शकतो, असा अंदाज हे राजकीय पंडित वर्तवत आहेत.