मुंबई : नवे मंत्रिमंडळ आणि खाते वाटप बाबत आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज दिल्लीला जाणार आहेत. दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यादरम्यान ते गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि पंतप्रधान मोदी (Pm Modi) यांची भेट घेतील, असं सांगितलं जातंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अमित शाह यांच्यासोबत आणि जेपी नड्डांसोबत या भेटीमध्ये खाते वाटंबाबाबत ही चर्चा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर जातायत. एकनाथ शिंदे आणि भाजप पक्षश्रेष्ठींसोबतच्या या हाय व्होल्टेज भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. एकनाथ शिंदे यांनी ठाकरे आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का देत बंडखोरी केली. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं. यानंतर अमित शाह आणि मोदी यांच्याकडून एकनाथ शिंदे यांचं भरभरुन कौतुक करण्यात आलं होतं. आता आज (8 जुलै) दिल्लीत एकनाथ शिंदे यांचं जंगी स्वागत होण्याची शक्यताय.
एकनाथ शिंदे हे आज सायंकाळीच दिल्लीसाठी रवाना होणार आहेत. मात्र त्यांची पंतप्रधान मोदी आणि इतर भाजप नेत्यांची नियोजित भेट ही शनिवारी (9 जुलै) होणार आहे. शनिवारी ते पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतील.
एकनाथ शिंदे यांच्या बंडाखोरीदरम्यान भाजपनेही अगदी दिल्लीतून फिल्डिंग लावली होती. अमित शाह, जीपी नड्डा, हे नेते सतत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आलेली. राजधानी दिल्लीतून गुजरात आणि गुवाहाटीतली सूत्र फिरवली जात आहेत, अशीही चर्चा होती. आमदारांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात येत होती.
बंडखोर आमदारांचा आणि एकनाथ शिंदे यांचा बंडादरम्यानचा सर्व प्रवास हा भाजपशासित राज्यातून झाला होता. सुरुवातीला एकनाथ शिंदेंसोबत काही मोजके आमदार सुरतला पोहोचले, त्यानंतर तिथून शिंदे इतर आमदारांसह गुवाहाटीला गेले. गुवाहाटीवरुन आमदारांना गोव्याला नेण्यात आलं. ही सर्व राज्यात भाजप शासित होती. तिथल्या स्थानिक नेत्यांनी ही यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी अमित शाह आणि जे.पी नड्डा यांनी एकनाथ शिंदे यांचा कौतुक केलं होतं.