Cm Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला जाणार, मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरवूनच परत येणार

| Updated on: Jul 30, 2022 | 6:13 PM

दिल्लीत मंत्रिमंडळ विस्तारा बाबत महत्त्वाची चर्चा होणार आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरवूनच एकनाथ शिंदे हे परत येण्याची ही दाट शक्यता आहे. त्यामुळे आता राज्याला लवकरच नवे मंत्रिमंडळ मिळण्याची आशा लागलेली आहे.

Cm Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला जाणार, मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरवूनच परत येणार
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस,
Follow us on

मुंबई : राज्यात नवं सरकार स्थापन होऊन एक महिना उलटून गेला आहे. तरी मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा (Cabinet Expansion) अद्याप पत्ता नाहीये. मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार असा सवाल विरोधात रोज विचारत आहेत. तसेच त्यावरून बरीच टीका झाली आहे आणि लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार, हे ठरलेलं उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून सलग एक महिन्यापासून देण्यात येते. मात्र तरी या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडत नव्हता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तातडीने दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीत मंत्रिमंडळ विस्तारा बाबत महत्त्वाची चर्चा होणार आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरवूनच एकनाथ शिंदे हे परत येण्याची ही दाट शक्यता आहे. त्यामुळे आता राज्याला लवकरच नवे मंत्रिमंडळ मिळण्याची आशा लागलेली आहे.

विस्तारावरून अजित पवार आक्रमक

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे यावरून सतत सरकारला टार्गेट करत आहेत. राज्यात अतिवृष्टी होऊन गेल्यानंतर त्या त्या ठिकाणी मंत्र्यांची गरज होती. त्यावेळी योग्य पद्धतीने मदत पोहोचते. मात्र या दोघांच्याच मंत्रिमंडळात सध्या असल्याने शेतकऱ्यांना वेळीच मदत मिळत नाही, असा आरोप त्यांच्याकडून होता. तसेच तुमच्याकडे बहुमताचा आकडा आहे असे सांगताय तर मंत्रिमंडळ विस्ताराला का घाबरताय? असा थेट सवालही अजित पवार यांनी केला होता. तसेच मुख्यमंत्री हे आज नाशिक आणि औरंगाबादच्या दौऱ्यावर होते, मात्र हा दौरा आटोपता घेत ते दिल्लीत दाखल होणार होते.

काँग्रेसचीही सडकून टीका

हा शिंदे-फडणविस सरकारचा केविलवाणा प्रयत्न दिसतोय. निर्णयाची अंमलबजावणी होत असताना बिलकूल दिसत नाही. धडपड ही आमच सरकार आहे हे दाखवण्यासाठी आहे. सर्व जे गोळा झाले ते मंत्रिपदासाठी झाले. सर्वांना मंत्रीपद द्यायचे कसे हा प्रश्न त्यांना दिसतोय. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तार लांबलाय. यात अस्वस्थता आहे म्हणजे अस्थिरता आहे, अशी टीका मंत्रिमंडळ विस्तारावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

रोहित पवार काय म्हणाले?

फडणवीस सरकारला एक महिना पूर्ण झाला अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. राज्यातील अनेक विषय त्या त्या मंत्र्यांच्या माध्यमातून सुटत असतात. ते सध्या सुटताना दिसत नाहीयेत, म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार होणं गरजेचं आहे, असं मत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलंय. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर तरी मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळणार का? असाही सवाल उपस्थित झाला आहे.