मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आज आणि उद्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच दिल्लीच्या दौऱ्यावर जात आहेत. ते आज देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेणार असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे. तर ते उद्या पंतप्रधान मोदी (Pm Modi) यांची भेट घेत आहेत. आजच्या शिंदे आणि शाह यांच्या भेटीत राज्यातील खाते वाटपाबाबत महत्वपूर्ण चर्चा होऊ शकते. अद्याप कॅबिनेटचा शपथविधी बाकी आहे. खाते वाटपावर सविस्तर चर्चा झाल्यानंतरच कॅबिनेटचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज घेणार केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे दिल्लीतल्या या राजकीय भेटीगाठींचा सध्या चांगलाच बोलबाला आहे.
दुसरीकडे काही वेळापूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन संवादात पुन्हा शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. तसेच हिम्मत असेल तर मध्यावधी निवडणुका घ्या मग जनतेचा कौल कुणाला आहे, हे स्पष्ट कळेल असेही उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला थेट आव्हान दिलं आहे. तर भाजपवर ही सडकून टीका केली आहे.
राज्यात मोठे सत्तांतर झाल्यानंतर काही दिवसापूर्वी फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडला आहे. तर इतर मंत्र्यांचे शपथविधी आणि खाते वाटपाबाबत असूनही काही स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्या दिल्लीतील भेटीनंतर खाते वाटपाचा सस्पेन्स संपून खातेवाटप मार्गी लागण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा हा अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राज्यात सर्वात मोठे बंड होऊन सत्तांतर झाल्यानंतर भाजप नेत्यांनीही एकनाथ शिंदेंना तशीच साथ दिली आहे. शिवाय सर्वांना फडणवीस मुख्यमंत्री होतील असे वाटत असताना भाजपने बाजी पलटत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिले आहे, त्यामुळे आज दिल्लीत मोठी राजकीय खलबतं होण्याची शक्यता आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि जे पी नड्डा यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं होतं. आता भाजप अनेक महत्वाची खाती ही त्यांच्याकडेच ठेवण्याच्या पवित्र्यांत असल्याच्याही चर्चा सुरू आहेत. याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.