पुणे : आषाढी एकादशीनिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाईची शासकीय पूजा पार पडली. त्यानंतर संध्याकाळी एकनाथ शिंदे यांनी पुण्यात कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित केलं. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. तसंच हा मेळावा एकनाथ शिंदे गटाचा नाही तर बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) विचारांचा मेळावा आहे, शिवसैनिकांचा हा मेळावा आहे, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा (Hindutva) तेजस्वी विचार पुढे नेणारा मेळावा असल्याचं म्हटलंय. तसंच शिंदे म्हणाले की, यायला उशीर झाला. गेले 15 दिवस मी धावपळ घेतोय. सुरुवातीचे 3 दिवस, 3 रात्र तर मी झोपलोही नव्हतो. या सर्व 50 आमदारांची जबाबदारी माझी होती. एकीकडे सत्ताधीश होते, मोठे मोठे नेते होते. मात्र शिवसेनेचे 40 आमदार आणि सहयोगी आमदारांनी विश्वास ठेवणं सोपं नव्हतं.
बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जातोय. आज मी मुख्यमंत्री म्हणून उभा आहे तो आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादामुळे, बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे. तुम्ही धर्मवीर चित्रपट पाहिला असेल. त्यातही सगळं काही सांगता किंवा दाखवता आलं नाही. त्यांनी शिवसेना वाढवली ती बाळसाहेब ठाकरेंना आदर्श मानून. त्यांनी दाखवलेला त्याग आजही विसरू शकत नाही. त्यांच्यासमोर 20 – 22 वर्षात खूप मोठे प्रसंग आले पण ते पहाडासारखे उभे राहिले. एकनाथ तुला समाजासाठी जगायचं आहे, हा समाज तुझं कुटुंब आहे, असं मला त्यांनी सांगितलं होतं. शाखाप्रमुख ते राज्याचा प्रमुख हा प्रवास सोपा नव्हता. बाळासाहेबांचं हिंदुत्व पुढे नेण्याचं काम करतोय, असंही शिंदे यांनी सांगितलं.
शिंदे यांनी टीकाकारांना उत्तर देताना विरोधकांवर निशाणा साधला. काय काय उपमा दिल्या गेल्या. कामाख्या देवीवरुनही टीका झाली. मात्र, देवीनं काय केलं तुम्ही बघितलं. टीका करणाऱ्यांना आम्ही कामातून उत्तर देणार. हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करुन उत्तर देणार. आमदाराला सांगितलं की तुमचं नुकसान होतंय. तेव्हा जबाबदारी हा एकनाथ शिंदे घेईल. सभागृहातील भाषण तुम्ही बघितलं असेल. ते थोडच होतं. वेळ आली तर पुन्हा एकदा बोलेन. मी कमी बोलतो, जास्त ऐकतो आणि काम करतो. पुणे विमानतळावर आलो तेव्हा रस्त्याच्या कडेनं लोकाचं प्रेम पाहायला मिळालं. लाखो लोग सहभागी झाले होते, माझं स्वागत करत होते. पोलीस मला सांगत होते. मात्र, मी त्यांना म्हटलंय, ज्यांच्याकडून धोका होतो तो आता टळला आहे. इथल्या माणसांकडून आम्हाला धोका नाही, असंही शिंदे यांनी आवर्जुन सांगितलं.