मुंबई : महाविकास आघाडी सरकारला सत्तेतून खाली खेचत राज्यात शिंदे सरकार आलं आहे. विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात शिंदे सरकारनं विश्वासदर्शक ठराव 164 विरुद्ध 99 अशा फरकाने जिंकलाय. विश्वासमत जिंकल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सभागृहात केलेलं भाषण चांगलंच गाजलं. आपल्या भाषणात शिंदे यांनी चौफेर फटकेबाजी केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या टीकेलाही शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं. शिंदे यांच्या सभागृहातील भाषणावररुन आज उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला. रिक्षावाल्याची रिक्षा काल सुसाट सुटली होती, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी शिंदेंवर निशाणा साधला. तर रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा (Mercedes) स्पीड फिका पडला, कारण हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, असं प्रत्यु्त्तर शिंदे यांनी ठाकरेंना दिलंय.
रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार!!#MaharashtraFirst
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 5, 2022
एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर डॅमेज कंट्रोलसाठी स्वत: उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. त्यांनी शिवसेनेतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकांचा सपाटाच लावलाय. आजही शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महिला आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे यांनी रिक्षावाल्याची रिक्षा काल सुसाट सुटली होती, रिक्षाला ब्रेकच लागत नव्हता, असा टोला लगावला. एकनाथ शिंदेंचं भाषण सुरु असताना सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन होतं की अपघात तर होणार नाही ना. काल उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचा माईक खेचला, पुढे काय काय खेचतील माहिती नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका केलीय.
उद्धव ठाकरे यांच्या रिक्षावाला या टीकेला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रत्युत्तर दिलंय. काँग्रेसनं पंतप्रधान मोदींना चायवाला म्हणून हिणवलं होतं. ज्यांनी चायवाला म्हणून हिणवलं त्यांच्यावर मोदींनी पाणी पिण्याची वेळ आणली. आज त्यांच्या पक्षाची काय अवस्था आहे, हे तुम्ही पाहताय. आम्ही रिक्षावाले असून तर आम्हाला अभिमानच आहे. पान टपरी, चहा टपरीवाले असू किंवा रस्त्यावरील विक्रेते असू आम्हाला अभिमान आहे. कारण या देशात तो स्वाभिमानाने जगतो. मोदींच्या काळात सामान्य माणूसच राजा होईल, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्यांनी हे समजून घ्यावं, अशा शब्दात फडणवीस यांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय.