नागपूर : ‘अनुसूचित जाती मोर्चा’च्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. देशात मोदीजींच्या नेतृत्वात गरीब, अनुसूचित जातींच्या कल्याणासाठी भाजप सरकार काम करत आहे. मोदी सरकार आणि दुसऱ्या सरकारमध्ये फरक बघितलं तर कथनी आणि करणी याचा फरक आहे. साडेचार वर्षात आम्ही काम केलं. देशात मोदीजींच्या सरकारने स्वप्न साकार केले, असे मुख्यामंत्र्यांनी यावेळी सांगितले.
“आज 70-80% लोकांकडे घर नाहीत, परंतू 2022 पर्यंत सगळ्यांना घर मिळणार. गरीबांना लुटण्याचं काम काँग्रेस सरकारने केलं. सगळ्यांच्या घरात लाईट पोहचवण्याचं काम मोदींनी केलं”, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसचा फोलपणा दाखवत भाजपने केलेल्या विकासाचा पाढा वाचला.
“बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेण्याचा अधिकार काँग्रेसला नाही. संविधान सभेत जाण्यापासून काँग्रेसने बाबासाहेबांना रोखलं होतं, निवडणुकीत बाबासाहेबांना काँग्रेसन हरवलं, मात्र अनुसूचित जातीचा वापर काँग्रेसने वोट बँक म्हणून केला. आता त्यांचा विकास होत आहे. भारतीय संविधानाला कुणीच बदलू शकत नाही. जोपर्यंत मोदी आहेत, तोपर्यंत संविधानाला कोणी हातही लावणार नाही”, असेही फडणवीसांनी सांगितलं.
पुढे ते म्हणाले, “काही पक्ष मोदींच्या विरोधात मोर्चा उठवत आहेत. मात्र, त्याची आम्हाला चिंता नाही, कारण अनुसूचित जाती आमच्यासोबत आहेत. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी काँग्रेसने एक इंचही जागा दिली नाही. इंदुमिलची जागा काँग्रेसला बळकवायची होती, मी मुख्यमंत्री झाल्यावर मोदींनी तीन दिवसांच्या आत महाराष्ट्र सरकारला जमीन दिली. त्यामुळे आज आम्ही बाबासाहेबांच्या स्मारकाचं काम केलं.”
“2020 मध्ये चैत्यभूमीवर तुम्हाला इंदू मिल जागेवर स्मारक उभे दिसेल. लंडनचे घर विकायला निघाले होते. केंद्र सरकारच्या मदतीने लंडनचे घर विकत घेतले. जुलै महिन्यात हे घर आम्ही सर्वांसाठी खुले करू. देशात आणि केंद्रात असलेले सरकार अनुसूचित जातीचे हित लक्षात घेणारे सरकार आहे. अनुसूचित जातींसाठी कार्य करणारा पक्ष म्हणजे भाजप. 2014 मध्ये सर्वात जास्त अनुसूचित जातीचे खासदार निवडणून आले. 2019 मध्ये देखील सर्वात जास्त अनुसूचित जातीचे खासदार भाजपचे राहतील”, असा विश्वासही यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.