मुंबई : “काही लोकांना सत्तेचे स्वप्न पडत आहेत. अनेक दिवसांपासून सत्ता पाडण्याचं ऐकत आहे. हिंमत असेल तर सरकार पाडा, आम्ही तुमच्या सारखे गुळाच्या ढेपेला चिटकलेले मुंगळे नाहीत. वाटेला जाल तर काय ते दाखवून देऊ, असं थेट आव्हानच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दसरा मेळाव्यातून दिलं. (CM Uddhav Thackeray Speech at ShivSena Dussehra rally 2020)
राज्यात सत्ता आल्यानंतरचा आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा होता. त्यामुळे या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय राजकीय भाष्य करणार याकडे संपूर्ण देशाचे लागले होते. अपेक्षेनुसार उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या तडाखेबंद भाषणातून विरोधकांची पिसे काढली.
“अनेक जण तारीख पे तारीख देतात. अनेक जण स्वप्न बघतात. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा. आम्ही गुळाच्या ढेपेला चिकटणारे मुंगळे नाही. जर वाटेला जालं, तर मुंगळा कसा डसतो तेही तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. मी वाघाची औलाद आहे, त्याला जर डिवचले तर काय होतं त्याचे इतिहासात दाखले आहे. भविष्यातही पाहायला मिळतील,” असे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.
“महाराष्ट्राच्या हिताच्या आड येणाऱ्याला आडवा करुन गुढीपाडवा उभारण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. बेडकाच्या पिलाने वाघ पाहिला, वाघ पाहून तो लपला,” अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंसह त्यांच्या पुत्रांवर जोरदार टीका केली.
“महाराष्ट्राच्या मातीतून छत्रपती शिवाजी महाराजांसारखे तेज जन्माला आलं, ते तेज कायम आहे. हिंदुत्वाबद्दल आम्हाला प्रश्न विचारले जातात का तर मंदिरं उघडले नाहीत म्हणून.. पण आम्हाला कोण विचारतंय… ज्यावेळी बाबरी पाडली त्यावेळी हे शेपट्या घालून बसले होते,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
“घंटा बडवा थाळ्या बडवा हे तुमचं हिंदुत्व, आमचं हिंदुत्व असलं नाही, हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व आहे. नुसतं गरगर फिरुन काय उपयोग, भोवराही गरगर फिरतो,” असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला
“तुमच्यासाठी देशातील जनता ही मत असतील तर माझ्यासाठी ती हाडामासाची माणसं आहेत. जेवढं लक्ष पक्षावर देता, तेवढं तुम्ही देशाकडे द्या,” अशीही टीका उद्धव ठाकरेंनी भाजपवर केली.
“जीएसटीची करपद्धत फसली आहे. ते पंतप्रधान मोदींनी मान्य करावं. सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे पुढे या आपण यावर चर्चा करु,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
“एकतर कोणाच्या पाठीत वार करायचा नाही आणि पाठीत वार कुणी केला तर कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहायचं नाही, हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वाक्य आम्ही पाळतो. माझं टार्गेट भाजप नाही.”
“मोहन भागवत यांना राष्ट्रपती केलं पाहिजे, असे सांगत होतं. पण संघमुक्त भाजप करणाऱ्या नितीश कुमारांच्या गळ्यात गळे तुम्ही घालताय. तुम्ही त्याला हिंदुत्वाची लस दिली की त्यांनी तुम्हाला सेक्युलरची लस दिली,” असा टोलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लगावला.
“मुंबई पाकव्याप्त काश्मीर झालं आहे. पाकव्याप्त काश्मीर सोडा, पण अधिकृत काश्मीरमध्ये एक तरी इंच जमीन घेऊन दाखवा, मुंबईचं मीठ खायचं आणि नमक हरामी करायची,” असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
“महाराष्ट्र पुढे जातो, म्हणून अनेकांचा पोट दुखतं आहे. चरस गांजा उघड विकला जातो, असे चित्र उभं केलं जातं आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक घराबाहेर तुळशी वृंदावन आहे. तुमच्याकडे गांजाची वृंदावने आहेत का?” असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी उपस्थितीत केला आहे.
“केवळ महाराष्ट्र पुढे जातो म्हणून पोलिसांना बदनाम केलं जात आहे. मुंबई पाकव्यापत काश्मीर झालं, असं बोलणं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान आहे. ते पंतप्रधानांचा अपयश आहे.”
“जर तो बिहाराचा पुत्राच्या आत्महत्येबाबत काही काळंबेरं असेल तर ते मुंबई पोलिसांना सांगितलं असतं. सावध राहा, देशाचे तुकडे होऊन देणार नाही. जो कोणी मुंबईचे तुकडे तोडायचा प्रयत्न करेल त्याच्या देहाचा तुकडा ही शिवसेनाप्रमुख म्हणाले आहेत,” असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.
“मेट्रोची कारशेडला स्थगिती दिली. कांजूरमार्गाला ती कारशेड नेतो आहे. ती कारशेड ही कल्याण, डोंबिवलीपर्यंत जी मेट्रो होणार आहे, त्यांच्यासाठीही ती कारशेड आहे.”
“अंहकारी राजा आणि कळसूत्री बाहुल्या असं मी म्हटलं तरं चालेल का? या कळसूत्री बाहुल्यांचा खेळ संपवलेला आहे. यापुढे येथे मर्द मावळ्यांचा सरकार येणार आहे,” असेही उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितले.
“दहीहंडी फोडायला गेल्यानंतर वर लटकू नका, हंडी आणि तुम्ही दोघंही खाली पडालं. कोणीही चालेल पण हे नको असा विचार आता सुरु झाला आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
“डोळे उघडून मतदान करा, असं बिहारच्या जनतेला आवाहन आहे. कोणत्याही समाजाला न्याय दिल्याशिवाय मी राहणार नाही. कोणाचं काहीही कमी होणार नाही. जातीपाती आणि समाजात जे कोणी भिंती उभ्या करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यांच्या राजकारण्यांना बळी पडू नका,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
“महाराष्ट्राच्या एकजुटीला तडा जाईल, असे काही मी करणार नाही, असे शपथ यावेळी घ्या,” असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे या मेळाव्यासाठी उपस्थित होते. दसरा मेळाव्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी दसऱ्याच्या शुभदिनी सहकुटुंब हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले. मुख्यमंत्र्यांच्या भाषणाआधी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. शाहीर नंदेश उमप यांच्या पोवाड्याने या कार्यक्रमाला सुरुवात झाली.
दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांनी जय्यत तयारी केली आहे. दसरा मेळाव्यात छायाचित्रणासाठी बंदी घालण्यात आली होती. मात्र, तरीदेखील शिवसेनेकडून दसरा मेळाव्यासाठी सुरु असलेल्या तयारीचे फोटो व्हायरल झाले आहे. (CM Uddhav Thackeray Speech at ShivSena Dussehra rally 2020)
संबंधित बातम्या :
उद्धव ठाकरे आज दोन भूमिकांमध्ये, त्यामुळे भाषणासाठी कान आतूरलेले : किशोरी पेडणेकर
उद्धव ठाकरे सावरकर स्मारकात पोहोचले, ढोलताशांच्या गजरात स्वागत