नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली (CM Thackeray meet PM Modi in Delhi). उद्धव ठाकरेंनी आपल्या दिल्ली दौऱ्यात आदित्य ठाकरेंनाही सोबत नेले आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंची उपस्थिती हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यामुळे या दौऱ्यात ते कोणत्या नेत्यासोबत काय चर्चा करणार याबद्दल उत्सुकता वाढली आहे.
आपल्या दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींचीही भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे सायंकाळी 5.30 वाजता नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी दाखल झाले. यानंतर ते सायंकाळी 6 वाजता सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतील. साडेसात वाजता ते भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचीही भेट घेणार आहेत.
The Chief Minister of Maharashtra, Shri Uddhav Thackeray as well as Minister in the Maharashtra Government, Shri @AUThackeray called on PM @narendramodi. @OfficeofUT pic.twitter.com/YOmxsBCGO3
— PMO India (@PMOIndia) February 21, 2020
मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पुणे विमानतळावर स्वागत केलं होतं. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि मोदींची अवघ्या काही मिनिटांची ओझरती भेट झाली होती. मात्र आता उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्रपणे मोदींची सदिच्छा भेट घेतली. या नियोजित भेटीत काय होणार, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या भेटीला राजकीय रंग न देण्याचं आवाहन केलं होतं. परंतु शिवसेना-भाजप युतीमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची थेट चर्चा होणार आहे. त्यामुळे या भेटीत महाराष्ट्रातील बदललेल्या राजकीय स्थितीवर आणि भविष्यातील राजकीय शक्यतांवर चर्चा होते की नाही याकडेही सर्वांचेच लक्ष लागले आहे.
भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मात्र उद्धव ठाकरेंच्या या भेटीवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे नेमकं काय करतात हे त्यांचं त्यांनाच कळत नाही. ते नेमकं कशासाठी दिल्लीत भेटायला गेले आहेत हेही कळालं नाही. राज्यात महाविकास आघाडी सरकारचं लक्ष हे लोकांची कामं करण्यावर नव्हे, तर फक्त खुर्ची टिकवण्यावर असल्याचीही टीका दरेकरांनी केली.
CM Thackeray meet PM Modi in Delhi