सिंधुदुर्ग: राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमदेवार संजय पवार (sanjay pawar) यांचा पराभव झाला आहे. शिवसेनेच्या या पराभवावर केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी जोरदार टीका केली आहे. ठाकरे सरकारला आपले आमदार टिकवता आले नाही. त्यांच्यावर आमदारांचाही विश्वास राहिला नाही. सत्तेसाठी 145 मते लागतात. त्यामुळे आघाडी सरकार अल्पमतात आलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्याकडे नैतिकता असेल तर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन बाजूला व्हावे, अशी मागणी नारायण राणे यांनी केली आहे. नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
तीन सीट जिंकणार सांगत होते, काय झालं? राऊतही एका मताने आले. काठावर आले. वाचले आमच्या हातातून. आघाडीची मते त्यांना मिळायला हवी होती. ते सत्तेत आहेत. सत्तेसाठी 145 मते लागतात. तुम्ही अल्पमतात आले आहात. तुम्ही राजीनामा द्या. नैतिकतेचं भान असेल तर राजीनामा द्या बाजूला व्हा, असं नारायण राणे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दहा वर्ष मागे नेला. तुमचे आठ आमदार फुटतात. तुमची विश्वासहार्यता आहे कुठे? तुमचे आमदार तुम्ही टिकवू शकत नाही आणि बढाया मारता. आमची मते पाहिली तर तुमच्यापेक्षा जास्त आहेत. तुम्ही अल्पमतात आला आहात, असंही त्यांनी सांगितलं.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी जी प्रतिक्रिया दिली त्यातून बोध घ्या. चांगल्याला चांगलं म्हणणं हा माणूसकीचा धर्म आहे. पवारांकडून माणूसकीचा धर्म घ्या. कुणाबद्दल तरी चांगलं म्हणा. तुमच्याकडून अपेक्षा नाही. कराण तुमचा स्वभाव मला माहीत आहे. तुम्ही सत्तेसाठी लायक नाहीत असं म्हणणार नाही. पण तुम्ही मुख्यमंत्रीपदासाठी पात्र नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.
काही लोक तीन जागा जिंकणारच अशा बढाया मारत होते. कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी जी भाषा वापरली नाही त्या भाषेत बोलत होते. फडणवीसांवर टीका करत होते. आम्ही वाघ आहोत, अमूक आहोत, असं सांगत होते. अत्यंत खालच्या भाषेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही बोलत होते. मी त्यांच्या भाषेचा उच्चार करणार नाही. मुख्यमंत्री ज्या भाषेत बोलतात ती संसदी भाषा नाही. पण या पराभवामुळे उद्धव ठाकरे यांची राज्यात आणि देशात नामूष्की झाली आहे. बेअब्रू झाली आहे. असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला हे दुर्देव आहे, असं नारायण राणे म्हणाले.
राज्यसभेत निष्ठेमुळे विजय झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मार्गदर्शनामुळे विजय झाला, असं सांगतानाच येणाऱ्या महापालिकेतही आम्हीच विजयी होऊ. 2024च्या निवडणुकीत शिवसेना 20 आमदारही निवडून आणणार नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.